
जम्मू, 14 जुलै (हिं.स.)पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या सुरू असलेल्या तपासाच्या संदर्भात, एका विशेष एनआयए न्यायालयाने पाकिस्तानस्थित प्रतिबंधित दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईदविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. एनआयए न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी ८ जुलै रोजी हा आदेश दिला. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणात सईदविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर दोन दिवसांनी हा आदेश आला आहे.सईदला भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांनी जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार म्हणूनही त्याला ओळखले जाते.
जम्मू येथील विशेष एनआयए न्यायालयात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात सईदवर वैयक्तिकरित्या आणि लश्कर-ए-तोयबा (LeT) व त्याची सहयोगी संघटना 'द रेझिस्टन्स फ्रंट' (TRF) यांचा प्रमुख म्हणून आरोप ठेवण्यात आले आहेत. त्याच्यावर भारतीय दंड संहिता (IPC), २०२३ आणि बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा, १९६७ च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार, एनआयएने न्यायालयाला कळवले की, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सरगोधा येथील रहिवासी असलेला फरार दहशतवादी हाफिज सईद हा पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील आरोपी असून तो जाणीवपूर्वक अटक टाळत आहे. पुढील कारवाई सुरू करता यावी यासाठी एजन्सीने त्याच्याविरुद्ध अनिश्चित मुदतीचे अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्याची मागणी केली होती.
न्यायालयाने आदेशात म्हटले आहे, निष्पक्ष, संपूर्ण आणि प्रभावी तपासासाठी आरोपीची अटक आणि कोठडीतील चौकशी आवश्यक आहे. त्यामुळे, त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात येत आहे आणि कायद्यानुसार अंमलबजावणीसाठी ते डीआयजी, एनआयए, जम्मू यांच्याकडे पाठवण्यात येत आहे. गेल्या वर्षी २२ एप्रिल रोजी, दक्षिण काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी २६ नागरिकांची हत्या केली होती. मृतांपैकी बहुतेक पर्यटक होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे