
पुणे, 14 जुलै (हिं.स.) : मोशी कचरा डेपो येथे झालेल्या भीषण दुर्घटनेत नऊ कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने जबाबदारी निश्चित करण्याच्या दृष्टीने कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांना निलंबित का करू नये, याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील दररोजचा घनकचरा मोशी डेपो येथे आणला जातो. येथे कचऱ्याचे वर्गीकरण करून वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प राबविण्यात येत असून, जुन्या कचऱ्याच्या डोंगराचे बायोमायनिंग करण्याचाही प्रस्ताव होता. मात्र, कचऱ्याचा प्रचंड ढिगारा प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याने तीन मजली इमारत जमीनदोस्त झाली.
या दुर्घटनेत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आठ तर कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकून एका अशा एकूण नऊ कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेत संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा ठपका ठेवत आयुक्तांनी दोन्ही अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई का करण्यात येऊ नये, याबाबत खुलासा मागविण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू असून, चौकशी अहवालाच्या आधारे पुढील प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
----------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु