सोलापुरात 13 दुचाकी चोरीची कबुली; 40 चोरींचा मास्टरमाइंड ताब्यात
सोलापूर, 14 जुलै (हिं.स.)। सोलापूर शहर गुन्हे शाखेने चार वर्षांत सोलापूर, धाराशिव आणि सातारा जिल्ह्यांतून तब्बल 40 दुचाकी चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला अटक केली आहे. अटकेतील आरोपीने गेल्या सहा महिन्यांतच 13 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे.
Cp


सोलापूर, 14 जुलै (हिं.स.)। सोलापूर शहर गुन्हे शाखेने चार वर्षांत सोलापूर, धाराशिव आणि सातारा जिल्ह्यांतून तब्बल 40 दुचाकी चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला अटक केली आहे. अटकेतील आरोपीने गेल्या सहा महिन्यांतच 13 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सत्यवान रामहरी भोसले (वय 32, रा. पडसाळी, ता. उत्तर सोलापूर) असे आहे. फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वसंत विहार परिसरातूनएमएच-13 डीके-5511 क्रमांकाची दुचाकी चोरीच्या तपासादरम्यान तो पोलिसांच्या रडारवर आला.

सोलापूर शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहर गुन्हे शाखेने विशेष तपास मोहीम हाती घेतली. सहायक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने विविध घटनांचे तांत्रिक विश्लेषण केले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयित तरुण हेल्मेट हातात घेऊन पायी येत असल्याचे आणि चोरी केल्यानंतर दुचाकीवरून निघून जात असल्याचे स्पष्ट झाले.त्यानुसार पोलिसांनी संशयिताचा शोध सुरू केला. हैदराबाद रोडवरील बाजार समितीजवळ तो चोरीच्या दुचाकीसह असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गेल्या सहा महिन्यांत 13 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पुढील तपासात त्याच्याकडून सोलापूर, धाराशिव आणि सातारा जिल्ह्यांतील मिळून 40 दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.पोलिस आरोपीकडून आणखी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत असून, चोरीस गेलेल्या दुचाकी जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande