
पुणे, 14 जुलै (हिं.स.) : पावसामुळे पुणे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असताना, नागरिकांना खड्ड्यांच्या तक्रारी थेट महापालिकेकडे नोंदविण्यासाठी सुरू करण्यात आलेले 'पीएमसी रोड मित्र' हे मोबाईल ॲप गेल्या चार महिन्यांपासून बंद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींचे प्रभावी निवारण करण्याबाबत महापालिकेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी नुकतेच नागरिकांना याच ॲपच्या माध्यमातून रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी नोंदविण्याचे आवाहन केले होते. तसेच, ७२ तासांच्या आत खड्डे बुजविण्यात आले नाहीत तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. मात्र, तक्रार नोंदविण्याचे प्रमुख माध्यमच बंद असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते १२ ऑगस्ट २०२५ रोजी 'पीएमसी रोड मित्र' ॲपचे उद्घाटन करण्यात आले होते. या ॲपद्वारे नागरिकांना रस्त्यांवरील खड्ड्यांचे छायाचित्र किंवा व्हिडिओ अपलोड करून तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तक्रार संबंधित पथ विभागाकडे तातडीने पाठविणे, ७२ तासांच्या आत खड्ड्यांची दुरुस्ती करणे आणि काम पूर्ण झाल्यानंतर 'पूर्वी' व 'नंतर'ची छायाचित्रे अपलोड केल्यानंतरच तक्रार निकाली काढणे, अशी यंत्रणा या ॲपमध्ये विकसित करण्यात आली होती.
मात्र, प्रत्यक्षात ॲपच कार्यरत नसल्याने नागरिकांना तक्रारी नोंदविता येत नाहीत. परिणामी, पावसाळ्यात वाढलेल्या खड्ड्यांच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्याबाबत महापालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
-----------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु