
जळगाव, 14 जुलै (हिं.स.) - रावेर तालुक्यातील नांदूरखेडा शिवारात युवकाची हत्या झाल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल आणि एक मोबाईल फोनही पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणातील तपासाला वेग आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐनपूर येथील रहिवासी शेख कुर्बान शेख शब्बीर (वय 30) यांचा नांदूरखेडा शिवारात गळा दाबून खून करण्यात आला होता. या प्रकरणी गणेश संजय घोरपडे आणि मेघराज वसंत सांगळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी गणेश घोरपडे याला मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील सागवानी परिसरातून, तर मेघराज सांगळे याला भोर रेल्वे स्टेशन परिसरातून अटक केली. अटकेनंतर दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तपासासाठी आवश्यक बाबींचा विचार करून दोन्ही आरोपींना पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले. या प्रकरणात पोलिसांनी गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल आणि एक मोबाईल जप्त केला आहे. या वस्तूंच्या आधारे तपास अधिक सखोल करण्यात येत असून घटनेमागील नेमके कारण आणि इतर बाबींचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, हा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आणण्यासाठी रावेर पोलिसांसह जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तपणे कारवाई केली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर आणि पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज महाजन, उपनिरीक्षक तुषार पाटील आणि तपास पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून, तपासादरम्यान आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर