आषाढी वारीसाठी भीमा नदीत 2 टीएमसी पाणी मात्र शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष ?
सोलापूर, 14 जुलै (हिं.स.)। पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेले उजनी धरण सध्या 52 टक्के भरले आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या परवानगीने भीमा नदीत 2 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, जि
ujani dam news


सोलापूर, 14 जुलै (हिं.स.)। पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेले उजनी धरण सध्या 52 टक्के भरले आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या परवानगीने भीमा नदीत 2 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, जिल्ह्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी शेतीसाठी कालव्याद्वारे पाणी सोडण्याची मागणी केली आहे.

यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने अनेक ठिकाणी पिके अडचणीत आली आहेत. मोहोळ, पंढरपूर, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, करमाळा आणि माढा तालुक्यातील शेतकरी उजनी धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडण्याची मागणी करत आहेत. मात्र, 'एल निनो'च्या संभाव्य परिणामांचा विचार करून धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्यास शासनाच्या परवानगीची अट ठेवण्यात आली आहे. याशिवाय, लाभक्षेत्र विकास विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे पाणी सोडण्याबाबत जिल्ह्यातील एकाही आमदाराने अधिकृत पत्र दिले नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या उजनीच्या पाण्यापेक्षा पावसाचीच प्रतीक्षा करावी लागत आहे.

सन 2015 नंतर प्रथमच पावसाळ्याच्या हंगामात उजनी धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी पुढे आली आहे. 2015 मध्येही कमी पावसामुळे अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. विशेष म्हणजे, गतवर्षी सोलापूर जिल्ह्यात महापुराची परिस्थिती होती. मात्र, यंदा अद्याप सरासरी एवढाही पाऊस झालेला नसल्याने पेरण्या अडचणीत आल्या असून अनेक भागांत दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande