
पुणे, 14 जुलै (हिं.स.)। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा मंगळवारी (दि. १४) सकाळी पाटस (ता. दौंड) येथे दाखल झाला. टाळ-मृदंगाचा गजर, फुलांची उधळण आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात ग्रामस्थांनी पालखीचे उत्स्फूर्त स्वागत केले.
वरवंड ते उंडवडी हा पालखी सोहळ्यातील सर्वांत मोठा टप्पा मानला जातो. पुढील रोटी घाटाचा प्रवास वारकऱ्यांसाठी सुखकर व्हावा, यासाठी पाटस ग्रामस्थांनी पारंपरिक गोड जेवणासह चहा-नाश्त्याची उत्तम व्यवस्था केली.
रविवारी (दि. १२) यवत येथे पहिला आणि सोमवारी (दि. १३) वरवंड येथे दुसरा मुक्काम केल्यानंतर मंगळवारी सकाळी ६ वाजता आरतीनंतर पालखी सोहळा बारामती तालुक्यातील उंडवडी गवळ्याच्या दिशेने मार्गस्थ झाला. वरवंडपासून सुमारे चार किलोमीटर अंतरावरील भागवतवाडी येथे सकाळी आठच्या सुमारास पालखीचे आगमन झाले. येथे वारकऱ्यांसाठी चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती.
काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर पालखी सोहळा सकाळी सव्वा नऊच्या सुमारास पाटसच्या मुख्य चौकात पोहोचला. यावेळी ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने स्वागत करत भक्तिभावाचे दर्शन घडविले. त्यानंतर पालखीने गावचे ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिरात प्रवेश केला. भाविकांसाठी दर्शनाची व्यवस्था खुली करण्यात आली.
रोटी घाट हा पुढील प्रवासातील आव्हानात्मक टप्पा असल्याने पाटस ग्रामस्थांनी वारकऱ्यांसाठी नेहमीप्रमाणे गोड जेवणाची व्यवस्था केली. ग्रामस्थांच्या या प्रेमळ आदरातिथ्याचे वारकऱ्यांनी कौतुक केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या अनुराधा सत्वशील शितोळे, पंचायत समिती सदस्य शिवाजीबापू ढमाले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सागर शितोळे, ज्येष्ठ नागरिक डॉ. मधुकर आव्हाड, माजी ग्रामपंचायत सदस्य तानाजी केकाण, संभाजी देशमुख, स्वप्नील भागवत, गणेश चव्हाण, उद्योजक राहुल आव्हाड, ग्रामसेवक दीपक बोरावके, ग्रामसेवक भाऊसाहेब कांबळे, कवी सुधीर पानसरे, अशोकराव पानसरे, आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु