भावली पर्यटनस्थळ प्रकरणातील आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी
नाशिक, 15 जुलै (हिं.स.)। भावली धरण परिसरात पर्यटकांच्या कुटुंबावर झालेल्या हल्ला प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाने शनिवार, दि. १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. न्यायालयात सरकारी पक्ष आणि तपास अधिकार्यांनी आरोपींच्या पोलीस कोठडी
भावली पर्यटनस्थळ प्रकरणातील आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी


नाशिक, 15 जुलै (हिं.स.)।

भावली धरण परिसरात पर्यटकांच्या कुटुंबावर झालेल्या हल्ला प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाने शनिवार, दि. १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. न्यायालयात सरकारी पक्ष आणि तपास अधिकार्यांनी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी करताना पोलिसांनी सुरुवातीला केवळ चौकशीसाठी आरोपींना ताब्यात घेतले होते; ती अधिकृत अटक नव्हती. घटना घडलेल्या दुर्गम भागात मोबाईलला रेंज नसल्यामुळे पोलिसांशी तातडीने संपर्क साधणे शक्य होत नव्हते, असा युक्तिवाद केला.

पीडित कुटुंबातील तरुणीची छेड काढत संपूर्ण कुटुंबाला मारहाण करण्यात आली. पीडित कुटुंबाची गाडी आरोपींनी रस्त्यात सहा ठिकाणी अडवून तोडफोड करत दहशत माजवली. पर्यटकांची चोरीला गेलेली सोन्याची चैन आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली हत्यारे जप्त करणे बाकी असल्याचेही न्यायालयाला सांगण्यात आले.

अटक केलेल्या आरोपींपैकी तीन आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती मिळवणे गरजेचे आहे. तसेच पर्यटकांना शिट्ट्या मारणारे मुख्य टवाळखोर अद्याप फरार असून त्यांचा शोध घेणे सुरू आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला.

पोलिसांच्या कारवाईवर आरोपींच्या वकिलांनी आक्षेप घेत न्यायालयात फिर्यादीने तक्रारीत ३० किलोमीटर पाठलाग करून मारहाण झाल्याचे म्हटले असून टोलनाक्यापर्यंत घटना घडल्याचे सांगितले. यात मोठी विसंगती असल्याचे आपल्या युक्तिवादात न्यायालयाला सांगितले.

फिर्यादी कुटुंबानेही तेथील स्थानिक खाद्यपदार्थ विक्रेत्यांना आणि लोकांना मारहाण केली. पोलिसांना मूळ आरोपी कोण आहेत, हे ठाऊक नसून त्यांनी केवळ संशयावरून उचलून आणले. पोलिसांनी लावलेले जीवघेण्या हल्ल्याचे कलम चुकीचे असून तेथे तशी कोणतीही गंभीर घटना घडलेली नाही. दोन आरोपींना सोमवार, दि. १३ जुलै रोजी रात्री २.३० वाजता अटक केली. त्यांना २४ तासांच्या आत न्यायालयात हजर करणे बंधनकारक होते. यासाठी पोलीस ठाण्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे, अशी मागणी आरोपींच्या वकिलांनी केली.

दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य आणि तपास पूर्ण करण्यासाठी आरोपींची दि. १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande