
रायगड, 15 जुलै (हिं.स.)। रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पाटणोली गावात पाच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पेण पोलिसांनी संशयित आरोपीला अवघ्या काही तासांत अटक केली असून त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) तसेच पॉक्सो (पोक्सो) कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटणोली-कांजोली आदिवासीवाडी येथील फिर्यादी हे पत्नी व पाच वर्षीय मुलीसह १३ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजता घरी झोपले होते. १४ जुलै रोजी पहाटे सुमारे ३ वाजता मुलीची आई जागी झाल्यानंतर मुलगी शेजारी नसल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर कुटुंबीयांनी व गावकऱ्यांनी परिसरात तिचा शोध सुरू केला.
सकाळी सुमारे १०.४५ वाजता पाटणोली गावाजवळील ओढ्याच्या काठावरील जंगलातील झुडपामध्ये चिमुरडीचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळून आला. तिच्या डोक्यावर गंभीर दुखापतीच्या खुणा असून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
फिर्यादीने व्यक्त केलेल्या संशयाच्या आधारे त्याच वाडीतील एका व्यक्तीने चिमुरडीला घरातून उचलून नेले, तिच्यावर बलात्कार करून तिचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जंगलातील झुडपात टाकून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पेण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम १०३, १०३(१), ६५(२), १३७(२), ३३२, २३८ तसेच बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (POCSO) अधिनियम, २०१२ मधील कलम ४ व ६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)