जेनिफर विंगेट पुन्हा अडकणार विवाहबंधनात ?
मुंबई, 15 जुलै, (हिं.स.)। टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेट पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेनिफर सिंगापूरस्थित व्यावसायिक इश्माएल विल्यमसोबत लग्न करण्याच्या तयारीत आहे. हे दोघे काही काळापासून एकमेकांना
जेनिफर विंगेट पुन्हा अडकणार विवाहबंधनात?


मुंबई, 15 जुलै, (हिं.स.)। टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेट पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेनिफर सिंगापूरस्थित व्यावसायिक इश्माएल विल्यमसोबत लग्न करण्याच्या तयारीत आहे. हे दोघे काही काळापासून एकमेकांना डेट करत असल्याचे समजते आणि इश्माएलने नुकताच तिला लग्नासाठी प्रपोज केले, ज्याला अभिनेत्रीने होकार दिला आहे.

माहितीनुसार, जेनिफर आणि इश्माएल युनायटेड किंगडम (UK) मध्ये एका खाजगी समारंभात विवाहबंधनात अडकणार आहेत. या सोहळ्याला केवळ कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक उपस्थित राहतील असे सांगण्यात येत आहे. लग्नाची तारीख १६ जुलै असू शकते, अशी चर्चा आहे. मात्र, जेनिफर विंगेट किंवा तिच्या टीमकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

जेनिफरचे वैयक्तिक आयुष्य यापूर्वीही चर्चेचा विषय ठरले आहे. तिने २०१२ मध्ये अभिनेता करण सिंग ग्रोव्हरशी लग्न केले होते, परंतु हे नाते फार काळ टिकले नाही आणि २०१४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर करण सिंग ग्रोव्हरने अभिनेत्री बिपाशा बसूशी लग्न केले, तर जेनिफरने मात्र तिचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच प्रसारमाध्यमांच्या झगमगाटापासून दूर ठेवले आहे.

टीव्ही क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेल्या जेनिफर विंगेटला तिचे व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य वेगळे ठेवायला आवडते. त्यामुळेच, तिच्या दुसऱ्या लग्नाच्या बातमीने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. आता सर्वांचे लक्ष अभिनेत्री किंवा तिच्या टीमकडून मिळणाऱ्या अधिकृत प्रतिक्रियेकडे लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande