
रत्नागिरी, 15 जुलै (हिं.स.) । राजापूर तालुक्यातील एका महिलेची घरघंटी योजनेच्या नावाखाली आर्थिक फसवणूक झाली आहे. कोणतीही अधिकृत कागदपत्रे न देता त्या व्यक्तीने १२ हजार रुपये घेतल्याने या संपूर्ण व्यवहारावर संशय व्यक्त केला जात आहे.
संबंधित महिलेने पंचायत समितीमार्फत घरघंटी योजनेसाठी अर्ज केला होता. अर्ज स्वीकारताना योजना मंजूर होईल, याची खात्री देता येत नाही, असे तिला सांगण्यात आले होते. मात्र, अवघ्या पंधरा दिवसांत तिच्या घरी घरघंटी पोहोचविण्यात आली. घरघंटी आणून देणाऱ्या व्यक्तीने तुमच्या खात्यात पैसे जमा होतील, ते आम्हाला काढून द्या, असे सांगितले. मात्र घरघंटीच्या मंजुरीबाबत कोणतेही पत्र, बिल, पावती किंवा इतर अधिकृत कागदपत्र देण्यात आले नाही.
संबंधित व्यक्ती तीन वेळा महिलेच्या घरी आली. प्रत्येक वेळी मी लांज्यातून आलो आहे, एवढेच सांगण्यात आले. तो कोणत्या विभागाचा अधिकारी किंवा कोणत्या संस्थेचा प्रतिनिधी आहे, याची कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
दरम्यान, महिलेच्या बँक खात्यात १७ हजार रुपये जमा झाल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या सांगण्यावरून तिने १२ हजार रुपये काढून त्याच्याकडे दिले. मात्र या रकमेची कोणतीही पावती किंवा लेखी नोंद देण्यात आली नाही. त्यानंतर घरात विजेची व्यवस्था करा. आमचा माणूस येऊन घरघंटी बसवेल व सर्व माहिती देईल, असे सांगून संबंधित व्यक्ती निघून गेली.
या घटनेला तीन महिने उलटूनही घरघंटी बसविण्यासाठी कोणीही आलेले नाही. तसेच संबंधित व्यक्तीने पुन्हा संपर्कही साधला नाही. त्यामुळे महिलेने स्वतःच्या खर्चाने घरात वीज जोडणी करूनही घरघंटी वापरात आलेली नाही. भविष्यात यंत्रात बिघाड झाल्यास संपर्क कुणाशी साधायचा, वारंटी आहे का, सेवा कोण देणार, असे अनेक प्रश्न तिच्यासमोर उभे राहिले आहेत.
संबंधित महिलेने राजापूर पंचायत समितीचे उपसभापती अभिजित गुरव यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. प्राथमिक चौकशीत संबंधित महिला ही जिल्हा परिषद सेस फंडातून मंजूर झालेल्या घरघंटी योजनेची लाभार्थी असल्याचे स्पष्ट झाले. मात्र तिच्या घरी घरघंटी पोहोचवणारी व्यक्ती कोण होती, तिने कोणत्या अधिकाराने १२ हजार रुपये घेतले आणि अधिकृत कागदपत्रे का दिली नाहीत, याबाबत अद्यापही कोणतीही स्पष्टता झालेली नाही.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच अशा योजनांच्या नावाखाली लाभार्थ्यांची फसवणूक होणार नाही, यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी