
अमरावती, 15 जुलै (हिं.स.)। शहरातील रुक्मिनी नगर परिसरात राजेंद्र कॉलनी मार्गावर एका युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली आहे. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात या युवकाच्या हाताचा पंजा छाटला गेला. त्यानंतर तो पळत सुटला, पण हल्लेखोरांनी त्याला गाठून जागीच संपवले. या घटनेने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.सदर प्रकरणात पोलिसांनी दुपार पर्यंत चार आरोपींना अटक केली आहे
मृत युवकाची ओळख शेख अशफाक शेख शकील (२६, रा. ताजनगर, अमरावती) अशी समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार बुधवारी सकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास रुक्मिनी नगर ते राजेंद्र कॉलनी मार्गावर एका रुग्णालयानजीक अज्ञात हल्लेखोरांनी आफाक शेख याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या हाताचा पंजा तुटून खाली पडला. जीव वाचवण्यासाठी तो पळू लागला, पण आरोपींनी त्याचा पाठलाग करून त्याच्या गळ्यावर आणि छातीवर वार केले.गंभीर जखमी अवस्थेत शेख शकील शेख याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्त सांडून होते आणि आफाक शेख याचा हाताचा पंजा रस्त्यावर पडून होता.पोलिसांनी या प्रकरणी लगेच तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी करण्यात येत आहे. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. पोलिसांकडून सर्वच बाजूंनी तपास सुरू आहे. सकाळच्या वेळी या भागात फारशी वर्दळ नसते. आफाक शेख हा या परिसरात कसा पोहचला, हल्लेखोर त्याच्या मागावर होते का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
शहरात गेल्या काही महिन्यांपासून हत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. क्षुल्लक कारणावरून वाद निर्माण झाल्यानंतर हत्या झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. गेल्या महिन्यात तर एकाच दिवशी गाडगे नगर आणि बडनेरा परिसरात दोन जणांची हत्या करण्यात आली. पोलिसांनी शहरात शस्त्रास्त्रे जप्त करण्याची मोहिम उघडली आहे. गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. पण, गुन्हेगारी कमी होण्याची चिन्हे नाहीत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी