शहनाज गिल आणि जय रंधावा यांच्या 'इश्कनामा' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
मुंबई, 15 जुलै, (हिं.स.)। शहनाज गिल आणि जय रंधावा यांची मुख्य भूमिका असलेला पंजाबी ''पिरियड रोमान्स'' (ऐतिहासिक काळातील प्रेमकथा) चित्रपट ''इश्कनामा''चा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अरविंदर एस. खैरा दिग्दर्शित हा चित्रपट भारत-पाकि
शहनाज गिल आणि जय रंधावा यांच्या 'इश्कनामा' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित


मुंबई, 15 जुलै, (हिं.स.)। शहनाज गिल आणि जय रंधावा यांची मुख्य भूमिका असलेला पंजाबी 'पिरियड रोमान्स' (ऐतिहासिक काळातील प्रेमकथा) चित्रपट 'इश्कनामा'चा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अरविंदर एस. खैरा दिग्दर्शित हा चित्रपट भारत-पाकिस्तान सीमेवर बहरलेल्या एका सत्य प्रेमकथेवर आधारित आहे. या ट्रेलरमध्ये भावनिक प्रेम, फाळणीचे दुःख आणि सीमांच्या पलीकडे जाणारी नात्यांची खोली प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. हा चित्रपट २४ जुलै रोजी भारत, कॅनडा आणि युनायटेड किंगडममधील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

'हिंद पाक बॉर्डरनामा' या गाजलेल्या पुस्तकावरून प्रेरित असलेला हा चित्रपट १९८१ ते १९८८ या काळातील भारत-पाकिस्तान सीमेवरील पंजाब प्रदेशाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. या चित्रपटाची कथा भारतीय पंजाबमधील निम्मा हा तरुण शीख कवी आणि पाकिस्तानी पंजाबमधील नसीमा ही मुस्लिम तरुणी यांच्यातील प्रेमाभोवती फिरते; फाळणीची शोकांतिका आणि सीमांमुळे निर्माण झालेले अडथळे असूनही हे दोघे आपले प्रेम टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करतात. निर्मात्यांच्या मते, ही कथा सत्य घटनांवर आधारित आहे; असे सांगितले जाते की निम्मा अजूनही भारतात हयात आहे, तर नसीमा इंग्लंडला स्थायिक झाली आहे.

दिग्दर्शक अरविंदर एस. खैरा यांनी सांगितले की, 'इश्कनामा' ही केवळ एक प्रेमकथा नसून इतिहासाच्या पानांमधील एक सत्य कथा आहे, जी अत्यंत संवेदनशीलतेने मोठ्या पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. शहनाज गिलने नसीमाच्या भूमिकेला तिच्या कारकिर्दीतील सर्वात आव्हानात्मक भूमिकांपैकी एक असल्याचे म्हटले आहे, तर जय रंधावाने याला प्रेम, त्याग, प्रतीक्षा आणि नशिबाची कथा असे संबोधले आहे.

अरविंदर एस. खैरा दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती सौरभ राणा यांनी केली आहे. यात शहनाज गिल, जय रंधावा आणि सौरभ सचदेवा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande