
बीड, 15 जुलै (हिं.स.)। बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून किरकोळ कारणावरून एकमेकांचा जीव घेण्याचे प्रकार समोर येत आहेत. अंबाजोगाई येथील चनई वडरवस्ती परिसरात केवळ मुलीला का मारले, असा जाब विचारल्याच्या कारणावरून एका ५० वर्षीय महिलेच्या डोक्यात विट फेकून मारून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून एकाच कुटुंबातील चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. फिर्यादी यांच्या मुलीला आरोपीने मारहाण केली होती. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादीची आई गेल्या असता आरोपी याने शिवीगाळ करत त्यांच्यावर विट फेकून मारली. ही विट थेट यशोदा यांच्या डोक्यात लागल्याने त्या रक्तबंबाळ होऊन खाली पडल्या. भांडण सोडवण्यासाठी आलेले यांनाही आरोपीच्या मुलांनी काठीने बेदम मारहाण केली.
गंभीर जखमी यांना तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी आयसीयू वॉर्डात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी यांच्याविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सुरुवातीला मारहाणीचा गुन्हा दाखल होता, मात्र महिलेच्या मृत्यूनंतर यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा वाढवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब फड करत आहेत. पोलिसांनी आरोपी सुभाष लष्करे याला अटक केली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis