
टेक्सास (अमेरिका), 15 जुलै (हिं.स.)फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत स्पेनकडून २-० असा पराभव पत्करावा लागल्यानंतर, फ्रान्सचा कर्णधार किलियन एम्बाप्पेने कबूल केले की त्यांचा संघ नियोजित रणनीतीची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरला. त्याने मान्य केले की, फ्रान्सने प्रतिस्पर्ध्यांना सामन्यावर वर्चस्व ठेवण्याची संधी दिली.
स्पर्धेतून फ्रान्स बाहेर पडल्यानंतर एम्बाप्पे म्हणाला की, संघाची रणनीती स्पेनवर आक्रमक दबाव टाकण्याची आणि त्यांना मिडफील्डवर वर्चस्व गाजवू न देण्याची होती. पण ते या उद्दिष्ट या सामन्यात साध्य झालं नाही. आमच्यासाठी हे कठीण होते. रणनीतिकदृष्ट्या, आमची योजना त्यांच्यावर दबाव टाकण्याची, 'वन-टू-वन' खेळण्याची आणि त्यांना सामन्याची गती ठरवू न देता त्यांच्या पसंतीनुसार खेळू न देण्याची होती. त्यांना सामन्यावर आणि चेंडूवर नियंत्रण ठेवायचे असते, असे एम्बाप्पेने सांगितले.
फ्रेंच कर्णधाराने सांगितले की, स्पेनच्या मिडफील्डला खूप जास्त मोकळीक दिली गेली, ज्यामुळे स्पेनला चेंडूवरील ताबा राखता आला आणि सामन्यावर वर्चस्व गाजवता आले. आम्ही त्यांना तसे करू दिले. आम्ही त्यांच्या मिडफील्डला खेळण्यासाठी खूप जास्त वेळ दिला आणि त्यांच्याकडे खेळण्याचे कौशल्य आहे. जेव्हा तुम्ही स्पेनची रणनीती बदलत नाही, तेव्हा परिस्थिती कठीण होते. पेनल्टीमुळेही त्यांना सामन्यात परतण्यास मदत झाली आणि त्यानंतर त्यांनी दुसरा गोल केला; अंतिम फेरीत पोहोचण्याइतकी गुणवत्ता आमच्याकडे नव्हती, असेही त्याने नमूद केले.
एम्बाप्पेने पराभवाची जबाबदारी स्वीकारली आणि म्हटले की, कर्णधारपदासोबतच टीकाही सहन करावी लागते. विजय मिळवल्यावर जसा सर्व मान-सन्मान आपला असतो, तसाच विजय न मिळाल्यास त्याची जबाबदारीही आपल्यालाच घ्यावी लागते. हा माझ्या खेळाचा आणि आयुष्याचा एक भाग आहे. कर्णधार म्हणून मला सर्व जबाबदारी स्वीकारावीच लागेल. आम्हाला अंतिम फेरीत पोहोचायचे होते, पण ते शक्य झाले नाही; त्यामुळे आता फुटबॉल चाहते जे काही म्हणतील ते आम्हाला स्वीकारलेच पाहिजे, असे तो म्हणाला.
शनिवारी होणारा तिसऱ्या स्थानासाठीचा सामना हा फ्रान्सचे प्रशिक्षक दिदिए देशाँ यांचा संघासोबतचा अखेरचा सामना असेल. एम्बाप्पेला या सामन्याच्या महत्त्वाबाबत विचारले असता तो म्हणाला, फ्रेंच जनता आणि प्रशिक्षक म्हणून दिदिए यांचे आमच्यासाठी जे महत्त्व आहे, त्यात काहीही बदल झालेला नाही. त्यांचा अजून एक सामना बाकी आहे आणि आम्हाला त्यांच्यासाठी सर्वोत्तम खेळ करायचा आहे. कारण ते आणि चाहते याला पात्र आहेत की या विश्वचषकाचा शेवट तिसऱ्या स्थानावर व्हावा, असेही त्याने नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे