इंग्लंडमध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची धमाल; समीर-ओंकारची टीम इंडियाला साथ
मुंबई, 18 जुलै (हिं.स.)। इंग्लंडमधील कार्डिफच्या मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान मराठी मनोरंजनाचा खास रंग पाहायला मिळाला. सोनी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम *‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’* चे समीर चौघुले आणि ओंकार राऊत यांनी य
इंग्लंडमध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची धमाल; समीर-ओंकारची टीम इंडियाला साथ


मुंबई, 18 जुलै (हिं.स.)। इंग्लंडमधील कार्डिफच्या मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान मराठी मनोरंजनाचा खास रंग पाहायला मिळाला. सोनी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम *‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’* चे समीर चौघुले आणि ओंकार राऊत यांनी या सामन्याला उपस्थित राहून टीम इंडियाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला. क्रिकेट आणि मनोरंजनाचा सुंदर संगम घडवत त्यांनी सोनी स्पोर्ट्सच्या एक्स्ट्रा इनिंग्समध्ये विशेष उपस्थिती लावत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

सामन्यादरम्यान समीर आणि ओंकार यांनी एक्स्ट्रा इनिंग्ससाठी दिलेल्या खास मुलाखतीत क्रिकेटविषयी असलेले आपले प्रेम व्यक्त केले आणि टीम इंडियाला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. इंग्लंडच्या भूमीवर भारतीय संघाने सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करत क्रिकेटप्रेमींसोबत हा संस्मरणीय अनुभव शेअर केला.

या भेटीतील सर्वात खास क्षण म्हणजे भारतीय अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरसोबत रंगलेल्या मराठमोळ्या गप्पा. संवादादरम्यान शार्दुलने आपण *‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’* चा नियमित प्रेक्षक असल्याचे सांगत समीर आणि ओंकार यांच्या अभिनयाचे मनापासून कौतुक केले. तो म्हणाला, “जशी देवाने माझ्यावर कृपा केली आहे आणि त्यामुळे मला विकेट्स घेण्याची देणगी मिळाली आहे, तशीच देणगी तुम्हा दोघांनाही मिळाली आहे. तुम्ही तुमच्या अभिनयातून आणि विनोदातून लाखो प्रेक्षकांना मनमुराद हसवता.”

या खास मराठी संवादात समीर आणि ओंकार यांनी त्यांच्या गाजलेल्या ‘लोचन मजनू’ आणि ‘मनोमिलन स्वरछेडे’ या पात्रांच्या अंदाजात प्रेक्षकांशी दिलखुलास गप्पा मारत धमाल उडवली. त्यांच्या विनोदी शैलीने एक्स्ट्रा इनिंग्सचा माहोल आणखी रंगतदार झाला.

कार्डिफच्या मैदानावर उपस्थित भारतीय चाहत्यांनी समीर चौघुले आणि ओंकार राऊत यांना पाहताच त्यांच्यासोबत सेल्फी आणि छायाचित्रे काढण्यासाठी मोठी गर्दी केली. *‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’* मधील त्यांच्या लोकप्रिय व्यक्तिरेखा आणि अभिनयामुळे अनेक चाहत्यांनी त्यांना लगेच ओळखले आणि त्यांच्या कामाचे भरभरून कौतुक केले. मायदेशापासून हजारो किलोमीटर दूर इंग्लंडमध्येही मराठी कलाकारांना मिळालेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद मराठी मनोरंजनाच्या वाढत्या लोकप्रियतेची साक्ष देणारा ठरला.

कार्डिफच्या मैदानावर घडलेला हा संस्मरणीय क्षण केवळ सामन्याच्या निकालापुरता मर्यादित राहिला नाही; तर मराठी मनोरंजनाची लोकप्रियता देशाच्या सीमांपलीकडेही पोहोचल्याची आनंददायी झलक ठरला. समीर चौघुले आणि ओंकार राऊत यांच्या उपस्थितीमुळे क्रिकेट, मनोरंजन आणि मराठी संस्कृतीचा सुंदर संगम कार्डिफच्या मैदानावर अनुभवायला मिळाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande