
मुंबई, 19 जुलै (हिं.स.)।
भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान मानल्या जाणाऱ्या ७२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, अभिनेता राजकुमार राव यांच्या दमदार अभिनयाने सजलेल्या 'श्रीकांत' या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट हिंदी फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. या सन्मानामुळे चित्रपटाच्या संपूर्ण टीमवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दिग्दर्शक तुषार हिरानंदानी यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेला 'श्रीकांत' हा चित्रपट उद्योगपती श्रीकांत बोल्ला यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित आहे. दृष्टीदोष असतानाही जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर यशाचं शिखर गाठणाऱ्या श्रीकांत यांच्या संघर्षमय प्रवासाची प्रभावी मांडणी या चित्रपटातून करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अधिकृतरित्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली असून, यंदाच्या विजेत्यांची निवड ११ सदस्यीय परीक्षक मंडळाने केली. या परीक्षक मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ चित्रपट निर्माते जयराज होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर