रत्नागिरीतील शीळ धरणात शंभर टक्के पाणीसाठा
रत्नागिरी, 2 जुलै (हिं.स.) । रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात शंभर टक्के पाणीसाठा झाला असून पाणी भरून वाहू लागले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सलग सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांची पाणीपातळी आणि धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. आ
भरून वाहू लागलेले रत्नागिरीचे शीळ धरण


रत्नागिरी, 2 जुलै (हिं.स.) । रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात शंभर टक्के पाणीसाठा झाला असून पाणी भरून वाहू लागले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात सलग सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांची पाणीपातळी आणि धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. आज सकाळी संपलेल्या २४ तासांत सर्वाधिक १३२ मिलिमीटर पाऊस मंडणगडमध्ये, ११५ मिलिमीटर पाऊस राजापुरात, १०८ मिलिमीटर पाऊस गुहागरमध्ये, १०३ मिलिमीटर पाऊस दापोलीत, तर १०२ मिलिमीटर पाऊस रत्नागिरी तालुक्यात नोंदवला गेला. लांज्यात ९९, खेडमध्ये ८१, चिपळूणमध्ये ६३, तर संगमेश्वरमध्ये ६० मिलिमीटर पाऊस पडला.

खेडची जगबुडी नदी, चिपळूणमधली वाशिष्ठी, संगमेश्वर तालुक्यातल्या शास्त्री, सोनवी आणि बावनदी, लांज्यातल्या काजळी आणि मुचकुंदी आणि राजापुरातली कोदवली या नद्यांच्या पाणीपातळीत दोन दिवसांत सुमारे ०.२० मीटर ते दोन मीटर एवढी वाढ झाली आहे.

रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारं शीळ धरण १०० टक्के भरले असून, संगमेश्वर तालुक्यातील गडनदी मध्यम प्रकल्पात ६५.१८ टक्के पाणीसाठा झाला आहे. राजापूर तालुक्यातील अर्जुना मध्यम प्रकल्पात ४७.४ टक्के, लांजा तालुक्यातील मुचकुंदी प्रकल्पात ३२.९४ टक्के, खेड तालुक्यातील नातूवाडी मध्यम प्रकल्पात ३०.६१ टक्के पाणीसाठा झाला आहे. हा साठा गेल्या आठवड्याच्या तुलनेत सुमारे दोन ते सात टक्क्यांनी अधिक आहे.

शीळ धरण भरून वाहू लागल्याने रत्नागिरी शहराचा पाणीप्रश्न पूर्णपणे मिटला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande