
नाशिक, 02 जुलै (हिं.स.)।
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) नाशिक विभागाचा सातत्याने वाढणारा तोटा आणि प्रशासकीय कामकाजातील गंभीर त्रुटींची एसटी प्रशासनाने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. जबाबदारीकडे दुर्लक्ष करून या सर्व अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक विभागाचा तोटा मोठ्या प्रमाणात होईल या दृष्टीने कामकाज केल्याचा ठपका ठेवत विभागातील ११ उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना थेट निलंबित केल्याने एसटीच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वीच उत्पन्न वाढीसाठी सर्व स्तरावरील अधिकाऱ्यांना एक महिन्याचा अल्टिमेटम दिला होता. उत्पन्न न वाढल्यास बदली, पदावनती किंवा निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. विभागातील प्रति किलोमीटर उत्पन्न आणि प्रति किलोमीटर खर्च यांचा आढावा घेण्यासाठी जून महिन्यात महामंडळाचे व्यवस्थापक तथा नियंत्रण अधिकारी वीरेंद्र कदम यांनी सांख्यिकी व नियोजन नियोजन अधिकाऱ्यांसमवेत इगतपुरी आणि नाशिक – दोन आगाराचा अाढावा घेतला हाेता. या संदर्भात महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना सादर झालेल्या अहवालावरून एकाचवेळी बड्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
याच्यावर कारवाईचा बडगा
विभागातील प्रादेशिक अभियंता श्रावण सोनवणे, विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर, यंत्र अभियंता पंकज महाजन, विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले, वरिष्ठ आगार व्यवस्थापक (पंचवटी) सौरभ देवरे, लेखा अधिकारी निलीमा विसपुते, विभागीय लेखा अधिकारी संजय गायधनी, विभागीय भांडार अधिकारी अमोल वाघ, विभागीय कर्मवर्ग अधिकारी अश्विनी चव्हाण, विभागीय अभियंता चैताली भुसारे, आगार व्यवस्थापक प्रणव अहिरे यांचा समावेश असल्याचे समाेर आले आहे.
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV