रत्नागिरी : दोन एसटी बसच्या टकरीत १५ महाविद्यालयीन विद्यार्थी जखमी
रत्नागिरी, 2 जुलै (हिं.स.) । रत्नागिरी-उक्षी मार्गावरील फणसवळे पवारकोंड येथे आज (दि. २ जुलै) सकाळी साडेसातच्या सुमारास दोन एसटी बसमध्ये धडक झालेल्या झालेल्या अपघातात १५ कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी जखमी झाले. या अपघातात पटवर्धन हायस्कूल व महावि
दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक


रत्नागिरी, 2 जुलै (हिं.स.) । रत्नागिरी-उक्षी मार्गावरील फणसवळे पवारकोंड येथे आज (दि. २ जुलै) सकाळी साडेसातच्या सुमारास दोन एसटी बसमध्ये धडक झालेल्या झालेल्या अपघातात १५ कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी जखमी झाले.

या अपघातात पटवर्धन हायस्कूल व महाविद्यालयातील १५ विद्यार्थी-विद्यार्थिनी जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र एका बसचालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

भावेआडोम येथून रत्नागिरीकडे विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस फणसवळे येथे आली असता दुसऱ्या बसशी तिची जोरदार धडक झाली. धडकेनंतर स्थानिक नागरिक तातडीने घटनास्थळी धावले. त्यांनी विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढून त्वरित जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

अपघाताची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांनीही रुग्णालयात धाव घेतली. त्यामुळे काही काळ रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली. आपल्या मुलांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी पालकांची धावपळ सुरू होती. अपघातात सुजल सनगरे (१७), सिद्धेश खापणे (१७), तन्वी रेवाळे (१६), आदिती सत्यवान कांबळे (१७), तेजस्विनी अशोक खापणे (१७), कल्याणी रेवाळे (१७) या पटवर्धन हायस्कूलमधील विजू नाटेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह एकूण १५ विद्यार्थी-विद्यार्थिनी जखमी झाले. सर्व जखमी भावे आडोम येथील रहिवासी असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पावसाळी वातावरणामुळे समोरून येणारी बस दोन्ही चालकांना दिसली नसल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. भर रस्त्यात अपघात झाल्याने अरुंद रस्त्यावर काही काळ गोंधळ उडाला. मात्र चिंचोळ्या रस्त्यावरून वाहने निघून गेल्याने वाहतूक कोंडी झाली नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande