दिल्लीत मोठ्या हल्ल्याचा कट उधळला, आयएसआयशी संबंधित ४ दहशतवाद्यांना अटक
नवी दिल्ली, 02 जुलै (हिं.स.)एका मोठ्या आंतरराज्यीय कारवाईत, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या पाठिंब्याने चालणाऱ्या दहशतवादी आणि शस्त्र तस्करीच्या नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे या प्रकरणात, पोलिसांनी पंजाब आणि दिल्
आयएसआयशी संबंधित ४ दहशतवाद्यांना अटक


नवी दिल्ली, 02 जुलै (हिं.स.)एका मोठ्या आंतरराज्यीय कारवाईत, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या पाठिंब्याने चालणाऱ्या दहशतवादी आणि शस्त्र तस्करीच्या नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे या प्रकरणात, पोलिसांनी पंजाब आणि दिल्लीतील चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. जे एका पाकिस्तानी हँडलरच्या सांगण्यावरून राजधानीवर हल्ला करण्याचा कट रचत होते. अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून तुर्की बनावटीच्या झिगाना पिस्तुलासह दोन परदेशी बनावटीची पिस्तूलं, नऊ काडतुसे आणि पाच मोबाईल फोन जप्त करण्यात आले.

स्पेशल सेलचे डीसीपी प्रवीण कुमार त्रिपाठी यांच्या म्हणण्यानुसार, एसीपी विवेक कुमार त्यागी, इन्स्पेक्टर सतीश राणा आणि इन्स्पेक्टर अशोक यांच्या पथकाला तांत्रिक आणि गुप्त माहिती मिळाली होती की, पाकिस्तानस्थित आयएसआयचा हँडलर शहजाद भट्टी आपल्या साथीदारांसह दिल्ली एनसीआरमध्ये एक मोठा दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखत होता. त्याने पंजाबमधील स्थानिक तरुणांना आपल्या जाळ्यात ओढले होते.

प्राथमिक तपासानंतर, विशेष पथकाने भारतीय दंड संहिता आणि शस्त्र कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यानंतर, दिल्ली आणि पंजाबमधील अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. सर्वप्रथम, शुभदीप सिंग उर्फ विशला पंजाबमधून अटक करण्यात आली.

त्याच्याकडून एक सेमी-ऑटोमॅटिक पिस्तूल, पाच काडतुसे आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. चौकशीदरम्यान, त्याने शहजाद भट्टी नेटवर्कच्या पाकिस्तानी हँडलर्सच्या थेट संपर्कात असल्याची आणि ड्रोनद्वारे शस्त्रे व अमली पदार्थांची खेप स्वीकारत असल्याची कबुली दिली.

शुभदीपकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, त्याचे दोन साथीदार, गुरजंत सिंग उर्फ ऋषी आणि साजन सिंग उर्फ हनी यांना पंजाबमध्ये अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक 'जिगाना पिस्तूल' आणि चार काडतुसे जप्त करण्यात आली. पुढील कारवाईत, पोलिसांनी गगनप्रीत नावाच्या चौथ्या दहशतवाद्याला दिल्लीतून अटक केली. त्याच्या मोबाईल फोनमधून अनेक गुन्हेगारी पुरावे जप्त करण्यात आले.

अटक केलेल्या आरोपींपैकी, गगनप्रीतला त्याच्या पाकिस्तानी सूत्रधारांकडून एक अत्यंत धोकादायक काम सोपवण्यात आले होते. तो दिल्लीतील पोलीस ठाणी, पोलीस चौक्या आणि प्रमुख धार्मिक स्थळांची टेहळणी करून त्याचे चित्रीकरण करत होता आणि ते पाकिस्तानला पाठवत होता. त्याला दिल्लीतील एखाद्या ठिकाणी अंदाधुंद गोळीबार करून दहशत पसरवण्याचे कामही देण्यात आले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande