
बेंगळुरू, 02 जुलै (हिं.स.) : कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे गुरुवारी पहाटे दगड खाणीत झालेल्या भीषण दुर्घटनेत सात मजुरांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बेंगळुरू दक्षिण जिल्ह्यातील मदपट्टणा परिसरातील स्टोन क्रशर प्रकल्पात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, दगड खाणीत काम सुरू असताना सुमारे 40 फूट उंचीवरून मोठा खडक कोसळला. त्याखाली अनेक मजूर अडकले. या दुर्घटनेत 7 मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे.घटनास्थळी सुमारे 18 मजूर काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. मृत मजूर हे बिहार आणि आसाममधील असल्याचे पोलिसांनी सांगितले असून त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दुर्घटनेनंतर पोलिस, अग्निशमन दल आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. परिसराला सुरक्षा घेरा घालण्यात आला असून ढिगारा हटवून आणखी कोणी अडकले आहे का, याचा शोध सुरू आहे.दरम्यान, ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. तसेच खाणीत सुरक्षा नियमांचे उल्लंघन किंवा कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा झाला होता का, याचाही तपास करण्यात येत आहे.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी