
डॉ. हेडगेवारांचे राष्ट्रकार्य, त्याग आणि संघटनशक्ती रंगमंचावर होणार जिवंत
लातूर, 02 जुलै (हिं.स.)।
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना शताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रनिष्ठ विचारांचा जागर करणारे आणि संघ संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याचे प्रभावी दर्शन घडविणारे 'युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार' हे दोन अंकी भव्य महानाट्य शनिवार, ४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता लातूर येथील स्व. दगडोजीराव (दादा) देशमुख सभागृहात निःशुल्क सादर होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित हा प्रयोग लातूरच्या सांस्कृतिक इतिहासातील एक महत्त्वपूर्ण पर्व ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले
आहे. संघाच्या शताब्दी वर्षाला साजेशा स्वरूपात राष्ट्रभावना, सामाजिक समरसता, संघटनशक्ती आणि देशसेवेचा संदेश जनम निसापर्यंत पोहोचविण्याचा या महानाट्याम ागील प्रमुख उद्देश आहे. नागपूरच्या नादब्रह्मर्त संस्थेने या महानाट्याची निर्मिती केली असून पद्माकर धानोरकर हे निर्माते आहेत. डॉ. अजय प्रधान यांचे अभ्यासपूर्ण लेखन, ज्येष्ठ दिग्दर्शक सुबोध सुर्जीकर यांचे प्रभावी दिग्दर्शन आणि सुप्रसिद्ध संगीतकार शैलेश दाणी यांच्या संगीतामुळे हे महानाट्य अधिक भव्य व परिणामकारक बनले आहे. ज्येष्ठ प्रचारक रविजी भुसारी हे या महानाट्याचे संरक्षक
आहेत. या महानाट्यातून डॉ. हेडगेवार यांच्या बालपणापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपर्यंतचा संघर्षमय प्रवास, राष्ट्रभक्तीची अखंड प्रेरणा, संघटन उभारणीची दूरदृष्टी आणि भारताला वैभवशाली राष्ट्र बनविण्याचे त्यांचे स्वप्न प्रभावी नाट्यभाषेत साकारण्यात आले आहे. विचार, इतिहास आणि संस्कार यांचा सुरेख संगम असलेल्या या प्रयोगाला महाराष्ट्रासह छत्तीसगड, राजस्थान, गोवा, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि मध्य प्रदेशात पन्नासहून अधिक प्रयोगांमधून उत्स्फ प्रतिसाद मिळाला आहे. विशेष म्हणजे या महानाट्यासाठी कोणतेही प्रवेशशुल्क नसून सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य आहे. लातूर शहरासह जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी, स्वयंसेवक, कला रसिक आणि सांस्कृतिक प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राष्ट्रप्रेरणेचा हा अविस्मरणीय कलाविष्कार अनुभवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis