नांदेड - अमृत संस्थेतर्फे ग्रामीण भागात 'ईव्ही चार्जिंग स्टेशन' उभारणीचे आवाहन
नांदेड, 02 जुलै, (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था ''अमृत'' (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) च्या वतीने ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ग्र
नांदेड - अमृत संस्थेतर्फे ग्रामीण भागात 'ईव्ही चार्जिंग स्टेशन' उभारणीचे आवाहन


नांदेड, 02 जुलै, (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था 'अमृत' (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) च्या वतीने ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ग्रामीण व निमशहरी भागात उद्योजकतेला चालना देण्यासाठी 'अमृत ईव्ही (EV) चार्जिंग स्टेशन' उभारणीची योजना सुरू करण्यात आली असून, यासाठी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांकडून अर्ज व नोंदणीचे आवाहन करण्यात आले आहे.

हा उपक्रम 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स' मधील एका अभिमानास्पद प्रवासाचा भाग आहे. जिथे ऊर्जा हरित... तिथे भविष्य सुरक्षित! आणि ग्रीन एनर्जी, ग्रीन अर्थ, आपले भविष्य सुरक्षित अर्थ हे ब्रीद घेऊन ही योजना राबवली जात आहे. भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांची (EV) वाढती संख्या लक्षात घेता ग्रामीण भागात चार्जिंग पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि त्याद्वारे स्थानिक युवकांना हक्काचा व्यवसाय मिळवून देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

ईव्ही चार्जिंग स्टेशनचे महत्त्व आणि फायदे:

पर्यावरण आणि इंधन बचत: या स्थानकांमुळे कार्बन उत्सर्जन कमी होऊन हवा स्वच्छ राहण्यास मदत होईल. तसेच पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व कमी होऊन वाहनधारकांच्या खर्चात मोठी बचत होईल.

ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी: ग्रामीण भागात हे चार्जिंग स्टेशन सुरू झाल्याने नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल.

शासनाचा भक्कम पाठिंबा: शासकीय योजना, आकर्षक अनुदान (सबसिडी) आणि प्रोत्साहनामुळे या व्यवसायातील गुंतवणूक सुरक्षित राहील आणि कमी जोखमीमध्ये अधिक नफा मिळवणे शक्य होईल.

मिळणारे सहकार्य आणि वैशिष्ट्ये:

या उपक्रमांतर्गत निवडक उमेदवारांना 'अमृत' संस्थेमार्फत विशेष व्यावसायिक व तांत्रिक मार्गदर्शन लाभणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित या स्टेशनसाठी देखभालीचा खर्च अत्यंत कमी असून, वाढत्या मागणीमुळे हा एक उच्च नफा देणारा स्थिर व्यवसाय ठरणार आहे.

इच्छुकांनी येथे संपर्क करावा:

हरित ऊर्जेचा वापर वाढवून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि या व्यावसायिक सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेने केले आहे.

नांदेड कार्यालय पत्ता: अमृत कार्यालय, अवैधनाथनगर नगर, कॅनल रोड, नांदेड.

संपर्क क्रमांक (नांदेड): ७३९१०६५४७२ (7391065472)

मुख्य कार्यालय संपर्क: ९७३०१५१४५० (9730151450)

अधिकृत संकेतस्थळ: www.mahaamrut.org.in

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande