नवतंत्रज्ञान व जोड व्यवसायातून शेतीची प्रगती साधा - संदीप माळोदे
नांदेड, 02 जुलै (हिं.स.)। शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती अधिक उत्पादनक्षम करावी. तसेच शेतीला पशुपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यव्यवसाय यांसारख्या जोड व्यवसायांची जोड देऊन आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्
Q


नांदेड, 02 जुलै (हिं.स.)। शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती अधिक उत्पादनक्षम करावी. तसेच शेतीला पशुपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यव्यवसाय यांसारख्या जोड व्यवसायांची जोड देऊन आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी केले. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषदेमार्फत विविध कृषी व पूरक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद कृषी विभाग आणि पंचायत समिती, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कै. वसंतराव नाईक जयंती व कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या पूनम पवार, पोखरणी येथील कृषी विज्ञान केंद्राचे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख, कापूस संशोधन केंद्राचे डॉ. अरविंद पंडागळे, कृषी विज्ञान केंद्र, सगरोळीच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. माधुरी रेवणकर, डॉ. शिवाजी शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीणकुमार घुले, जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे, उपविभागीय कृषी अधिकारी सुप्रिया वायवळ, आत्माचे उपविभागीय कृषी अधिकारी गुंजकर आदी मान्यवर उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या खेती बचाओ - धरती बचाओ अभियानांतर्गत जिल्हाभर जनजागृती सुरू असून शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर टप्प्याटप्प्याने कमी करून सेंद्रिय शेतीचा स्वीकार करावा, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र, पोखरणीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख यांनी केले. व्यापक जनजागृतीमुळे जिल्ह्यात अद्याप सुमारे ९५ टक्के शेतकऱ्यांनी पेरणी केलेली नसल्याने दुबार पेरणीचे संकट कमी राहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी विज्ञान केंद्रात माती व पाणी परीक्षणाची सुविधा उपलब्ध असून अडचणीच्या वेळी शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधावा, असेही त्यांनी आवाहन केले.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande