
छत्रपती संभाजीनगर, 02 जुलै (हिं.स.)। आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्हा आरोग्य विभागाने व्यापक नियोजन पूर्ण केले आहे.१२ जुलै २०२६ पासून जिल्ह्यातून विविध पालख्या मार्गक्रमण करणार असून वारकऱ्यांना सुरक्षित,तत्पर आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक अशा दोन्ही प्रकारच्या सेवांचा सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
यंदाच्या वारीत श्री गजानन महाराज, शेगाव,श्रीमंत एकनाथ महाराज, पैठण,श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थान, कोंडण्यापूर (विदर्भ) तसेच श्री क्षेत्र मुक्ताईनगर पालखी सोहळा या प्रमुख पालख्या धाराशिव जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहेत. जिल्ह्यातील विविध मार्गांवर एकूण १७ पालखी मुक्कामस्थळे असून या सर्व ठिकाणी आरोग्य सेवा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाने सर्वंकष नियोजन केले आहे.
पालखी मार्ग आणि मुक्कामस्थळी आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे,उपकेंद्रे तसेच पालखी मार्गावरील शासकीय संस्थांमार्फत स्थिर आणि फिरती आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत.आरोग्यदूतांच्या माध्यमातून संपूर्ण पालखी मार्गावर प्रथमोपचार सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.मुक्काम आणि विसाव्याच्या ठिकाणी आवश्यक औषधसाठ्यासह प्रथमोपचार पथके कार्यरत राहतील.
जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पालखी मार्गावरील पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, हॉटेल, ढाबे तसेच इतर सर्व पाणी स्रोतांची तपासणी आणि पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया आरोग्य कर्मचारी व ग्रामपंचायतींच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.
याशिवाय मुक्कामस्थळी आणि विसाव्याच्या ठिकाणी किटकजन्य आजारांवर नियंत्रण,ताप सर्वेक्षण, प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच हवेद्वारे पसरणाऱ्या संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष दक्षता घेतली जाणार आहे. वारकऱ्यांचे आयुष्मान भारत कार्ड काढणे,योगाची प्रात्यक्षिके आयोजित करणे,तसेच वयोवृद्ध आणि असंसर्गजन्य आजारांनी ग्रस्त रुग्णांना आवश्यक उपचार उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
आरोग्य शिबिरांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कोणत्या आजारांवर शासनाकडून पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार उपलब्ध होऊ शकतात,याबाबतही वारकऱ्यांना माहिती दिली जाणार आहे.प्रत्येक मुक्काम आणि विसाव्याच्या ठिकाणी आरोग्य शिबिरांसोबतच ‘हिरकणी कक्ष’ स्थापन करण्यात येणार आहे.
पालखी सोहळ्यादरम्यान तज्ज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांची पथके २४ तास सेवेत राहतील.बाह्यरुग्णांना मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध राहणार असून प्रत्येक पथकासोबत रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे.याशिवाय संदर्भ सेवेसाठी १०२ क्रमांकाच्या २० आणि १०८ क्रमांकाच्या ७ रुग्णवाहिका तसेच आरोग्यदूत सतत कार्यरत राहणार आहेत.
वारकऱ्यांच्या उपचारासाठी पालखी मार्गावरील खाजगी रुग्णालयांमध्ये १० टक्के खाटा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन आणि इंडियन प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांना स्वयंस्फूर्तीने वैद्यकीय सेवा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचे जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विनयशील कुलकर्णी तसेच जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी हे नियोजन आणि सनियंत्रणाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची सर्वंकष काळजी घेत सुरक्षित,सक्षम आणि अखंड आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी धाराशिव जिल्हा आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis