
बीड, 02 जुलै (हिं.स.)।
अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने तांत्रिक तपास आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करून नागरिकांचे हरवलेले एकूण १५ मोबाईल फोन शोधून काढले आहेत. पोलीस प्रशासनाने अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात संबंधित मूळ मालकांना बोलावून आवश्यक कायदेशीर पडताळणी पूर्ण केल्यानंतर हे सर्व मोबाईल फोन त्यांच्या स्वाधीन केले. ही कारवाई बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, या कामगिरीमुळे नागरिकांमधून पोलिसांचे कौतुक होत आहे.
या विशेष मोहिमेत अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार रविकुमार केंद्रे यांनी सायबर आणि तांत्रिक कौशल्याचा वापर करत सर्व मोबाईलचा माग काढला. पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मोबाईल हरवल्यास किंवा गहाळ झाल्यास घाबरून न जाता तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. तसेच मोबाईलमध्ये स्क्रीन लॉक, मजबूत पासवर्ड आणि इतर सुरक्षा यंत्रणांचा वापर करावा. नागरिकांच्या हरवलेल्या मौल्यवान वस्तू आणि मालमत्तेचा शोध घेऊन ती सुरक्षितपणे परत मिळवून देण्यासाठी पोलीस दल सदैव तत्पर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपले हक्काचे आणि महागडे फोन परत मिळाल्याने संबंधित नागरिकांनी अंबाजोगाई शहर पोलिसांचे मनापासून आभार मानले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis