
बीड, 02 जुलै (हिं.स.)।
अंबाजोगाई शहरात शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीरतेने घेत अंबाजोगाई शहर पोलिसांनी खाजगी कोचिंग क्लास चालकांवर नियमांचे कडक बंधन घालण्यास सुरुवात केली आहे. बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या विशेष सूचनेवरून आणि अप्पर पोलीस अधीक्षक चेतना व सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात शहरातील सर्व कोचिंग क्लास चालकांची एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बैठक पार पडली. कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांची होणारी गर्दी, अपुऱ्या सुविधा आणि सुरक्षेचा अभाव या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेमध्ये कोणतीही तडजोड न करता शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन व्हावे, या मुख्य उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी क्लास चालकांच्या मनमानी कारभाराला आणि ढिसाळ व्यवस्थापनाला चाप लावत थेट आणि कडक शब्दांत कायदेशीर ताकीद दिली. कोचिंग क्लास चालविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांसह इतर सक्षम प्राधिकरणांचे अधिकृत व वैध परवाने असणे आता बंधनकारक करण्यात आले असून त्यांचे वेळोवेळी नूतनीकरण करावे लागणार आहे. अनेकदा निवासी किंवा असुरक्षित इमारतींमध्ये क्लास चालवून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ केला जातो, ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी क्लासच्या इमारतीचे अधिकृत 'स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र' आणि वापरात असलेल्या मजल्यांची वैध कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
विद्यार्थ्यांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी वर्गखोल्यांमध्ये अग्निसुरक्षा नियमांचे पालन करणे, फायर एक्स्टिंग्विशर व फायर अलार्म कार्यरत स्थितीत ठेवणे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित बाहेर पडण्यासाठी अडथळामुक्त मार्ग (इमर्जन्सी एक्झिट) उपलब्ध ठेवणे अनिवार्य केले आहे. पैशांच्या हव्यासापोटी वर्गाच्या क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी कोंबणाऱ्या चालकांना पोलिसांनी चांगलाच दट्ट्या दिला असून, विद्यार्थ्यांना पुरेशी जागा, हवा आणि प्रकाश मिळेल याची दक्षता घेण्यास बजावले आहे. यासोबतच परिसरात स्वच्छ पिण्याचे पाणी, मुलींसाठी स्वतंत्र व स्वच्छ स्वच्छतागृहे आणि संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्याचे किमान एक महिन्याचे रेकॉर्डिंग सुरक्षित ठेवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर ठेवत, क्लास परिसरात रॅगिंग, छेडछाड किंवा सायबर गुन्ह्यांसारखा कोणताही अनुचित प्रकार घडल्यास अथवा संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ अंबाजोगाई पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी केले असून, निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis