
बीड, 02 जुलै (हिं.स.)। बीड जिल्ह्यात सरासरी ९.९ मिमी पावसाची नोंद झाली असून, यामध्ये पाटोदा तालुक्यात सर्वाधिक ३०.२ मिमी पाऊस पडला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत अहवालानुसार, जून ते सप्टेंबर या पावसाळी हंगामातील जिल्ह्याची एकूण सरासरी आता १०३.४ मिमी (१८.३ टक्के) झाली आहे. चालू वर्षीचा हा आकडा गेल्या वर्षी याच तारखेला झालेल्या ५८.८ मिमी (१०.४ टक्के) पावसाच्या तुलनेत लक्षणीयरीत्या अधिक असल्याने जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तालुकावार आकडेवारीचा विचार केला तर पाटोदखालोखाल परळी वैजनाथ तालुक्यात २५.२ मिमी, अंबाजोगाईत १८.९ मिमी आणि बीड तालुक्यात १२.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याउलट माजलगाव आणि शिरूर कासार तालुक्यात पावसाचा जोर अत्यंत ओसरलेला पाहायला मिळाला. सध्या केज तालुक्याने यंदाच्या हंगामात सर्वाधिक १८५.८ मिमी (३१.८ टक्के) टप्प्याची नोंद केली असून, धारूर तालुका मात्र अवघ्या ९.८ टक्क्यांसह जिल्ह्यात सर्वांत मागे आहे. आगामी काही दिवसांत संपूर्ण जिल्ह्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis