
रायगड, 02 जुलै (हिं.स.)। : समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय व असामान्य योगदान देणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्कार-2027 साठी नामांकित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नागरिक, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, शैक्षणिक संस्था तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.
कला, समाजकार्य, सार्वजनिक जीवन, विज्ञान व तंत्रज्ञान, व्यापार व उद्योग, वैद्यकीय सेवा, साहित्य व शिक्षण, उत्कृष्ट प्रशासकीय सेवा, क्रीडा व योग, भारतीय संस्कृती, मानवी हक्क, वन्यजीव संरक्षण, पर्यावरण संवर्धन आदी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पात्र व्यक्तींची नावे या पुरस्कारासाठी सुचविता येणार आहेत.
इच्छुक नागरिक किंवा संस्थांनी संबंधित व्यक्तीच्या कार्याचा संक्षिप्त परिचय, आवश्यक माहिती व कागदपत्रांसह नामांकन प्रस्ताव संबंधित तहसील कार्यालयामार्फत किंवा थेट जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड येथे 15 जुलै 2026 पर्यंत सादर करावेत.
जिल्ह्यातील अधिकाधिक पात्र व गुणवंत व्यक्तींना राष्ट्रीय स्तरावर सन्मानाची संधी मिळावी, यासाठी सर्व नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन योग्य व्यक्तींची नावे पुढे आणावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी, रायगड यांच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)