
रायगड, 02 जुलै (हिं.स.)। : रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीची आढावा बैठक उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती मधुकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. २) जिल्हा परिषदेत पार पडली. बैठकीत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य कार्यक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रे, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांचा गौरव करण्यात आला.
राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन (NQAS) अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्र लोहप आणि प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याशिवाय आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) अंतर्गत १०० टक्के आयुष्मान कार्ड निर्मितीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्जत व पनवेल तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आशा स्वयंसेविका, आशा गटप्रवर्तक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनाही प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
बैठकीत बोलताना सभापती मधुकर पाटील यांनी माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडून गावागावात दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवाव्यात, असे त्यांनी सांगितले. तसेच आरोग्य विभागाच्या सर्व उपक्रमांना यश मिळावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मनीषा चव्हाण यांनी टीबीमुक्त भारत अभियान अंतर्गत निक्षय मित्र उपक्रमात लोकप्रतिनिधींनी सहभागी होण्याचे आवाहन केले. प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याने आपल्या तालुक्यातील किमान एका क्षयरोग रुग्णाला दत्तक घेऊन त्याला पोषण आहार व सामाजिक आधार द्यावा, असे त्यांनी सांगितले.
याच बैठकीत माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत १०० टक्के आयुष्मान कार्ड निर्मिती केल्याबद्दल कर्जत तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कडाव आणि पनवेल तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र नेरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. बैठकीस जिल्हा परिषद सदस्यांसह आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)