ताडोबा व्याघ्र प्रकल्पात 80 चितळांच्या स्थलांतर मोहिमेला प्रारंभ
पहिल्या टप्प्यात 30 चितळांचे यशस्वी स्थलांतर चंद्रपूर, 2 जुलै (हिं.स.) : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (TATR) परिसरातील भक्ष्य प्राण्यांच्या घनतेतील प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी तृणभक्षी प्राण्यांच्या अंतर्गत स्थलांतर मोहिमेला प्रारंभ करण्यात आ
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात 80 चितळांच्या स्थलांतर मोहिमेला प्रारंभ


पहिल्या टप्प्यात 30 चितळांचे यशस्वी स्थलांतर

चंद्रपूर, 2 जुलै (हिं.स.) : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (TATR) परिसरातील भक्ष्य प्राण्यांच्या घनतेतील प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी तृणभक्षी प्राण्यांच्या अंतर्गत स्थलांतर मोहिमेला प्रारंभ करण्यात आला आहे. वैज्ञानिक नियोजन आणि परिसंस्था व्यवस्थापन धोरणांतर्गत कोअर क्षेत्रातील कोलारा वनपरिक्षेत्रातील जामणी गवताळ प्रदेशातून कोळसा वनपरिक्षेत्रातील कोळसा गवताळ प्रदेशात चितळांचे स्थलांतर करण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत वन्यजीव संरक्षण अधिनियम, 1972 च्या कलम 12 अंतर्गत राज्य शासनाची परवानगी मिळाल्यानंतर एकूण 80 चितळांच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत न होता 30 चितळांचे त्यांच्या नव्या अधिवासात यशस्वी स्थलांतर करण्यात आले.

30 जून रोजी 9 मादी व 7 नर अशा 16 चितळांचे, तर 1 जुलै रोजी 11 मादी व 3 नर अशा 14 चितळांचे स्थलांतर करण्यात आले. संपूर्ण मोहिमेदरम्यान कठोर सुरक्षा उपाययोजना, पूर्वतयारी म्हणून घेण्यात आलेल्या मॉक ड्रिल्स आणि अचूक नियोजनामुळे कोणत्याही वन्यप्राण्याला इजा झाली नाही.

चितळांना सुरक्षितरीत्या पकडण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त 'बोमा' तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. बोमा संरचनेतून चितळांना थेट विशेष रचनेच्या स्थलांतर वाहनांमध्ये नेण्यात आले. या वाहनांची रचना वन्यप्राण्यांवरील ताण कमी राहील आणि प्रवासादरम्यान त्यांना सुरक्षितता व आराम मिळेल, यासाठी करण्यात आली होती. तसेच नर आणि मादी चितळांचे स्वतंत्र नियोजन करून योग्य लिंग गुणोत्तरही राखण्यात आले.

ही मोहीम ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. प्रभू नाथ शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपसंचालक (कोअर) आनंद रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. सहाय्यक वनसंरक्षक विवेक नातू, अनिरुद्ध ढगे, वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल वैद्य, रुंदन काटकर आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी केली.

या यशस्वी स्थलांतरामुळे कोळसा वनपरिक्षेत्रातील तृणभक्षी प्राण्यांची संख्या संतुलित होण्यास मदत होणार असून, वाघांसारख्या सर्वोच्च भक्षकांसाठी आवश्यक असलेल्या भक्ष्यसाठ्यात वाढ होईल. आगामी टप्प्यात आणखी 50 चितळांचे स्थलांतर करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे, याच पद्धतीचा वापर करून मागील वर्षी जामणी गवताळ प्रदेशातून 107 चितळांचे यशस्वी स्थलांतर करण्यात आले होते.

याबाबत क्षेत्र संचालक डॉ. प्रभू नाथ शुक्ला यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे गाभा क्षेत्राची वहनक्षमता वाढेल, वाघांना पुरेसा अधिवास उपलब्ध होईल आणि मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यास मदत मिळेल. तर उपसंचालक आनंद रेड्डी यांनी सांगितले की, या मोहिमेमुळे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी कोणत्याही बाह्य संस्थेच्या मदतीशिवाय तांत्रिक स्वरूपाच्या वन्यजीव स्थलांतर मोहिमा यशस्वीपणे पार पाडण्याची क्षमता सिद्ध केली आहे.

__________

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande