नाशिक - मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे चरणसेवेला प्रारंभ
नाशिक, 02 जुलै (हिं.स.)। आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाचा नाम गजर करीत संत निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी एक एक पाऊल पंढरपूरकडे मार्गक्रमण करीत आहे. या पालखीत हजारो वारकरी सहभागी झाले आहेत. त्यांनी आतापर्यंत त्र्यंबकेश्वर ते नाशिकचे अंतर पार केले आहे
Chief Minister's Relief Fund


नाशिक, 02 जुलै (हिं.स.)। आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाचा नाम गजर करीत संत निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी एक एक पाऊल पंढरपूरकडे मार्गक्रमण करीत आहे. या पालखीत हजारो वारकरी सहभागी झाले आहेत. त्यांनी आतापर्यंत त्र्यंबकेश्वर ते नाशिकचे अंतर पार केले आहे. वारकऱ्यांचा आज सायंकाळचा विसावा गणेशवाडीत होता. तेथे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे चरणसेवा देण्यात आली. त्याचा सायंकाळपर्यंत अडीच हजारांवर वारकऱ्यांनी या सेवेचा लाभ घेतला. वारकऱ्यांच्या सेवेत आम्ही विठ्ठलाचे रुप पाहतो, अशा प्रतिक्रिया सेवेकरी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

आषाढी एकादशी निमित्त राज्याच्या विविध भागातून वारकरी पंढरपूरकडे रवाना होत आहेत. त्यात त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी चरणसेवा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिक शहरातील आर्युवेद महाविद्यालयाच्या आवारात वारकरी बांधवांना चरणसेवा देण्यात आली.

आयुर्वेद महाविद्यालयाचे विद्यार्थी, दराडे महाविद्यालय, गोखले फिजिओथेरपी महाविद्यालय, शिवा ट्रस्ट परिचारिका महाविद्यालयाचे विद्यार्थी चरणसेवा देत होते. त्यात ते पायांची मॉलिश करून देणे, प्रथमोपचार करून गोळ्या, औषधी देत होते. त्यासाठी आयुर्वेद महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज दीक्षित, मुख्यमंत्री सहायता मदत कक्षाचे स्थानिक प्रमुख डॉ. चैतन्य बैरागी, समन्वयक अमित डेरे, महेश नारायणकर आदी मार्गदर्शन करीत आहेत. याशिवाय आरोग्य विभागाचे पथक वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी तत्पर आहेत. त्यांचाही वारकऱ्यांना लाभ होत आहे.

टाकेद ता. इगतपुरी येथील काळू निगडे यांनी सांगितले, की वारीत त्र्यंबकेश्वर येथून सहभागी झालो.आहे. वयोमानामुळे पायांना थोडा त्रास जाणवत होता. मात्र, चरणसेवा मिळाल्यामुळे आता बरे वाटत आहे.

आयर्वेद शाखेचे शिक्षण घेणारा अमित डहाळे याने सांगितले की, चरणसेवा देण्याचा अनुभव वेगळाच आहे. प्रथमच अशा प्रकारची सेवा बजावताना आनंद होत आहे. वारकऱ्यांच्या सेवेच्या माध्यमातून विठ्ठलाची सेवा केल्याची भावना होत असल्याचे त्याने सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande