
पुणे, २ जुलै : देशभरात चर्चेत असलेल्या ‘नीट’ (NEET) परीक्षा पेपर घोटाळ्याच्या निषेधार्थ पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. ‘कॉकरोच पार्टी’च्या वतीने शुक्रवारी (दि. ३ जुलै) डेक्कन परिसरातील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ निदर्शने करण्यासाठी अर्ज करण्यात आला होता.
मात्र, कायदा व सुव्यवस्था आणि वाहतुकीवर होणारा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन पोलिसांनी ही मागणी फेटाळल्याचे स्पष्ट केले आहे.
आंदोलनामुळे परिसरातील शांतता भंग होण्याची तसेच वाहतूक व्यवस्थेवर अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याचे कारण आदेशात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, पुणे पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, परवानगीशिवाय आंदोलन आयोजित केल्यास किंवा पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कायदेशीर व कठोर कारवाई करण्यात येईल.
दुसरीकडे, पोलिसांचा निर्णय असूनही ‘कॉकरोच पार्टी’ने आंदोलनावर ठाम असल्याचे संकेत दिले आहेत. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची लवकरच बैठक होणार असून त्यामध्ये आंदोलनाची पुढील दिशा आणि अंतिम निर्णय जाहीर केला जाणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु