सोलापूर - जिल्हा बँकेवर नवे प्रशासकीय मंडळ?; भाजपच्या तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
सोलापूर, 02 जुलै (हिं.स.)। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर नवीन प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्याच्या हालचालींना वेग आला असून, भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राजेंद्र राऊत आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. मात्र,
dcc


सोलापूर, 02 जुलै (हिं.स.)।

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर नवीन प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्याच्या हालचालींना वेग आला असून, भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राजेंद्र राऊत आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. मात्र, या नियुक्तीबाबतचा अंतिम निर्णय राज्य सरकारमधील वरिष्ठ आणि वजनदार नेत्यांकडून घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

यासंदर्भातील प्राथमिक प्रक्रिया सुरू असून, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून आवश्यक अहवाल विभागीय सहनिबंधकांकडे पाठविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील तरतुदीनुसार प्रशासकीय मंडळ नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची चर्चा सहकार क्षेत्रात सुरू आहे.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर २०१८ पासून प्रशासक कार्यरत आहे. संचालक मंडळाच्या निवडणुकीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याने बँकेचा कारभार अधिक प्रभावीपणे चालविण्यासाठी प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्याचा पर्याय पुढे आला आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडून राजकीय स्तरावर हालचाली आणि लॉबिंगही वाढल्याचे बोलले जात आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँक ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाणारी महत्त्वाची वित्तीय संस्था असल्याने तिच्या प्रशासकीय मंडळाची नियुक्ती केवळ प्रशासकीय विषय राहिलेला नसून त्याला राजकीय महत्त्वही प्राप्त झाले आहे. त्यामुळे या नियुक्तीकडे सहकार क्षेत्राबरोबरच जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.

तथापि, प्रशासकीय मंडळाच्या नियुक्तीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसून, अंतिम निर्णय राज्य शासनाकडून जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande