
परभणी, 2 जुलै, (हिं.स.)। राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा माझे सहकारी मकरंद पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे गोदावरी पूरग्रस्त भागाच्या प्रश्नांवर निर्णायक बैठक पार पडली. यावेळी उपस्थित राहून गंगाखेड विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण परभणी जिल्ह्यातील गोदाकाठच्या अडचणी व समस्या मांडल्या. तसेच ठोस उपाययोजनांची मागणी केली.
जुलै-सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत गोदामाईने रौद्र रूप धारण केले होते. त्यामुळे अनेक गावी पाण्याखाली गेली. शिवाय काही ठिकाणी लोकांना बोटीने बाहेर काढावे लागले. बहुसंख्य गावांचा संपर्क तुटला. प्रशासनाची साधनसामग्रीही अपुरी पडली असती. पण अशी वेळ पुन्हा येऊ नये, यासाठी योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे सांगत हिवाळी अधिवेशनात मी आणि सहकारी आमदार राजेश विटेकर यांनी लक्षवेधी मांडली होती. त्याचीच दखल घेत मंत्री महोदयांनी आज सकारात्मक बैठक घेतली.
या महत्त्वपूर्ण बैठकीत गोदाकाठच्या धोकादायक गावांचे शास्त्रीय सर्वेक्षण करण्यासाठी ५ कोटींचा निधी तात्काळ मंजूर करण्यात आला. त्यामुळे कोणत्या गावाचे पूर्ण व अंशतः पुनर्वसन गरजेचे आहे हे स्पष्ट होईल. तसेच भविष्यात पूर आला, तरी गावांचा संपर्क तुटू नये म्हणून नदीवरील पूल व जोडरस्ते उंच करून बांधण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. शिवाय ज्या गावांचे पुनर्वसन झाले पण मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत, तिथे पाणी, रस्ते, वीज या सुविधा प्राधान्याने देण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आले. त्यामुळे गंगाखेड २० गावे, पालम २१, पूर्णा २२ अशा एकूण ११७ गावांच्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तरीही त्या सर्व गावांच्या सुरक्षित पुनर्वसनासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून योग्य तो सातत्याने पाठपुरावा करत राहीन.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघासह परभणी जिल्ह्यातील नागरिकांच्या जीवनाशी निगडित अतिशय ज्वलंत अशा विषयावर बैठक घेऊन सकारात्मक चर्चेसह योग्य ती उपाययोजना करण्यासंदर्भात मंत्री महोदयांनी संवेदनशीलपणे कार्यवाही केली. तसेच बैठकीसाठी वेळ दिली. याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार!
या बैठकीस आमदार विजयसिंह पंडित,आ.हिकमत दादा उढाण, परभणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲड.श्रीकांत विटेकर, यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis