
अमरावती, २ जुलै (हिं.स.) : जिल्ह्यात २९ व ३० जून रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे विशेषतः चांदूरबाजार व तिवसा तालुक्यांत मोठे नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने चांदूरबाजार तालुक्यात दोघांचा, तर तिवसा तालुक्यात नदीत बुडाल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या प्राथमिक अहवालात या नुकसानीची माहिती देण्यात आली आहे.
प्राथमिक अहवालानुसार, या दोन दिवसांत जिल्ह्यात सरासरी १८.८ मिमी पावसाची नोंद झाली असून दोन महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. चांदूरबाजार तालुक्यातील पांढरी येथील रविंद्र रामभाऊ आवारे (५३) आणि गोपाळ वासुदेवराव निर्वार (४०) यांचा पुराच्या पाण्यात वाहून जाऊन मृत्यू झाला.
याशिवाय, चांदूरबाजार तालुक्यात पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यात एक गाय, २० बकऱ्या आणि २० कोंबड्या अशा एकूण ४१ जनावरांचा मृत्यू झाला. तसेच तीन गावांतील ७० घरांचे नुकसान झाले असून त्यापैकी ६५ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे, तर पाच गोठ्यांचेही नुकसान झाल्याची नोंद आहे.
तिवसा तालुक्यातील सुरवाडी खुर्द येथील शेतकरी सतीश रंगरावजी गायकवाड (४३) यांचा पिंगळाई नदीत पडून बुडाल्याने मृत्यू झाला.
दरम्यान, शेतीपिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज घेण्याचे काम सुरू असून लाखणवाडी परिसरासह चांदूरबाजार तालुक्यातील विविध भागांमध्ये पंचनामे करण्यात येत आहेत. महसूल व कृषी विभागाची पथके नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण करत असून अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर नुकसानभरपाईची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी