डॉ. शिरीष वळसंगकर मृत्यू प्रकरणी फॉरेन्सिक अहवाल न्यायालयात सादर; पुढील सुनावणी २० जुलैला
सोलापूर, 02 जुलै (हिं.स.)। प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या मृत्यूप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात सरकार पक्षाने न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा (फॉरेन्सिक) अहवाल न्यायालयात सादर केला आहे. प्रमुख जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांच्या न्यायाल
डॉ. शिरीष वळसंगकर मृत्यू प्रकरणी फॉरेन्सिक अहवाल न्यायालयात सादर; पुढील सुनावणी २० जुलैला


सोलापूर, 02 जुलै (हिं.स.)।

प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या मृत्यूप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात सरकार पक्षाने न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा (फॉरेन्सिक) अहवाल न्यायालयात सादर केला आहे. प्रमुख जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांच्या न्यायालयात बुधवारी झालेल्या सुनावणीत हा अहवाल दाखल करण्यात आला असून, प्रकरणाची पुढील सुनावणी २० जुलै रोजी होणार आहे.

डॉ. शिरीष वळसंगकर यांनी १८ एप्रिल २०२५ रोजी त्यांच्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात एसी इन्स्टिट्यूट ऑफ न्युरो सायन्स (वळसंगकर हॉस्पिटल) येथील कर्मचारी मनीषा मुसळे-माने हिच्याविरोधात संशयित आरोपी म्हणून खटला सुरू आहे. यापूर्वी न्यायालयाने मनीषा मुसळे-माने हिचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळल्यानंतर आता खटल्याच्या नियमित सुनावणीला प्रारंभ झाला आहे.

तपासादरम्यान डॉ. वळसंगकर यांनी आत्महत्येच्या वेळी परिधान केलेले शर्ट व पॅन्ट, बाथरूममधील रक्ताने माखलेले टॉवेल, नॅपकिन, कपड्याचा तुकडा तसेच सिगारेटची थोटके जप्त करण्यात आली होती. या सर्व वस्तूंवरील रक्ताचे नमुने तपासणीसाठी मुंबई येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे पाठविण्यात आले होते. त्या तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो सरकार पक्षातर्फे न्यायालयात सादर करण्यात आला. मात्र, सादर करण्यात आलेला फॉरेन्सिक अहवाल अपूर्ण असल्याचे न्यायालयीन कामकाजादरम्यान नमूद करण्यात आले.

या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲड. प्रदीपसिंह रजपूत, मूळ फिर्यादीच्या वतीने ॲड. शशी कुलकर्णी, तर आरोपीच्या वतीने ॲड. प्रशांत नवगिरे काम पाहत आहेत. आता या खटल्याची पुढील सुनावणी २० जुलै रोजी होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande