शेतकऱ्यांनी घरच्या बियांणाचा वापर करावा; कृषी अधिकारी यांचे आवाहन
नांदेड, 02 जुलै, (हिं.स.)। शेतकऱ्यांनी घरच्या बियाणांचा वापर करावा. जमिनीतील ओलाव्याचा अंदाज घेऊनच पेरणी करावी. मागील वर्षी शेतकऱ्यांना सुमारे नऊशे कोटी रुपयांच्या पीक विम्याचा लाभ मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. यावर्षी हळद पिकाचाही पीक विमा योजने
शेतकऱ्यांनी घरच्या बियांणाचा वापर करावा; कृषी अधिकारी यांचे आवाहन


नांदेड, 02 जुलै, (हिं.स.)। शेतकऱ्यांनी घरच्या बियाणांचा वापर करावा. जमिनीतील ओलाव्याचा अंदाज घेऊनच पेरणी करावी. मागील वर्षी शेतकऱ्यांना सुमारे नऊशे कोटी रुपयांच्या पीक विम्याचा लाभ मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. यावर्षी हळद पिकाचाही पीक विमा योजनेत समावेश करण्यात असून, पीक विमा भरण्याची अंतिम मुदत १४ जुलै असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी सांगितले.

शेतकऱ्यांपर्यंत कृषीविषयक माहिती पोहोचविण्यासाठी गावनिहाय व्हॉट्सॲप गट तयार करण्यात आले असून या गटांवर उपलब्ध होणाऱ्या माहितीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप स्पर्धेअंतर्गत जिल्ह्यात 900 शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली असून पुढील काळात प्रत्येक गावात शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

कपाशीचे उत्पादन वाढविण्यासाठी 3 बाय 1.5 फूट अंतरावर लागवड करून रोपांची संख्या वाढविण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. जिल्ह्यात सुमारे 5 लाख 100 हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होत असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे यांनी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कृषी योजनांची सविस्तर माहिती दिली. तसेच संभाव्य एल निनोच्या सावटाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी घ्यावयाची खबरदारी, पीक नियोजन आणि पाणी व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करत त्यांनी स्वतः रचलेली जनजागृतीपर कविता सादर केली. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या सादरीकरणाला उपस्थित शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. अरविंद पंडागळे आणि डॉ. माधुरी रेवणकर यांनीही शेतकऱ्यांना आधुनिक शेती, पीक व्यवस्थापन आणि शाश्वत शेतीविषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रगतिशील शेतकरी तसेच बिरसा मुंडा कृषी स्वावलंबन योजना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतील लाभार्थ्यांचा वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande