अमरावतीसह विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज
अमरावती, 02 जुलै (हिं.स.)। जून महिना कमी पावसाचा व काहीसा काेरडा गेल्याने चिंतातूर झालेल्या शेतकरी व सामान्य नागरिकांसाठीही आनंदाची बातमी आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जुलैच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण विदर्भात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता
कोरड्या जूननंतर अखेर आनंदाची बातमी! जुलैच्या पहिल्या आठवड्यात अमरावती सह विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज


अमरावती, 02 जुलै (हिं.स.)। जून महिना कमी पावसाचा व काहीसा काेरडा गेल्याने चिंतातूर झालेल्या शेतकरी व सामान्य नागरिकांसाठीही आनंदाची बातमी आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जुलैच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण विदर्भात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यात अति तीव्र पाऊस हाेण्याचाही अंदाज आहे.

अमरावती वेधशाळेच्या निरीक्षणानुसार सध्या बंगालच्या उपसागरात तीव्र स्वरुपाचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. खाडीतून आर्द्रतायुक्त वारे ओडिसा, छत्तीसगड हाेत विदर्भापर्यंत वाहत आहेत. त्या प्रभावाने विदर्भात ७ जुलैपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. पाहणीनुसार १ ते ३ जुलैदरम्यान विदर्भाच्या काही जिल्ह्यात मुसळधार, तर सर्वत्र मध्यम तीव्रतेच्या पावसाची शक्यता आहे. ४ व ७ जुलै राेजी काही ठिकाणी अतितीव्र पाऊस हाेईल, असा अंदाज आहे. ६ जुलै राेजी सर्वच जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस हाेईल. हा संपूर्ण आठवडा पावसाळी वातावरणात जाईल, असा दिलासादायक अंदाज आहे.

केरळपासून काेकणापर्यंत वेळेत दाखल झाल्यानंतरही महाराष्ट्राला मान्सूनने माेठी प्रतीक्षा करायला लावली. मात्र पुढे एल-निनाेचा प्रभाव वाढल्याने मान्सूनला ब्रेक लागला. यंदा पाऊस येताे की नाही, अशीही भीती वाढली हाेती. मुंबईसह पश्चिम व मध्य महाराष्ट्राला १५ ते २० दिवस वाट पहावी लागली. त्यामुळे तिकडची धरणेही काेरडी पडल्याने चिंता वाढली हाेती. विदर्भातही आठ-दहा दिवस विलंबानेच मान्सूनचे आगमन झाले. पूर्व विदर्भातील बहुतेक धरणात समाधानकारक जलसाठा असला तरी कमजाेर मान्सूनच्या अंदाजाने खबरदारीचा इशारा देण्यात आला हाेता. २३ जूनला मान्सूनच्या पावसाने विदर्भात जाेरदार धडक देत वेगाने आगेकुच केल्याने सरासरी भरून निघेल, अशी अपेक्षा हाेती. मात्र त्यानंतर जूनचा शेवटचा संपूर्ण आठवडा काेरडा गेल्याने चिंतेचे ढग दाटले हाेते. धक्कादायक म्हणजे जून महिन्यात सरासरीपेक्षा ४० टक्के कमी पावसाची नाेंद झाली.

विदर्भात ऑरेंज अलर्ट

आता राज्यातील बहुतांश भागांत जोरदार पाऊस पडत आहे आणि पावसाने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. आज भारतीय हवामान विभागाने चंद्रपूर, भंडारा, वर्धा, नागपूर, अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande