
अमरावती, २ जुलै (हिं.स.) : शहरातील अतिगर्दीच्या सार्वजनिक व व्यावसायिक इमारतींमधील अग्निसुरक्षा व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी अमरावती महानगरपालिकेत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नागरिकांच्या जीवित सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच शहरातील सर्व गर्दीच्या इमारतींचे सर्वेक्षण करून १५ दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.
बैठकीत खाजगी कोचिंग क्लासेस, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, मॉल, हॉटेल, मंगल कार्यालये, बाजारपेठा तसेच इतर सार्वजनिक व व्यावसायिक इमारतींमधील अग्निसुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. अग्निशमन यंत्रणा कार्यरत आहे का, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग उपलब्ध आहेत का, अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेण्यात आले आहे का, तसेच अग्निसुरक्षा उपकरणांची नियमित तपासणी केली जाते का, याबाबत माहिती संकलित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून शहरातील अतिगर्दीच्या इमारतींची अद्ययावत नोंदणी करावी आणि प्रत्येक इमारतीच्या अग्निसुरक्षा स्थितीचा सविस्तर अहवाल १५ दिवसांत सादर करावा, असे निर्देश दिले.
याशिवाय, शहरासाठी अग्निसुरक्षेची प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्यात येणार असून त्यामध्ये किमान सुरक्षा मानके, नियमित तपासणी, मॉक ड्रिल, आपत्कालीन स्थलांतर आणि जबाबदार अधिकाऱ्यांच्या कर्तव्यांचा समावेश करण्यात येणार आहे. अग्निशमन विभाग, नगररचना विभाग आणि इतर संबंधित विभाग संयुक्तपणे हे सर्वेक्षण करणार आहेत.
ज्या इमारतींमध्ये अग्निसुरक्षेबाबत गंभीर त्रुटी आढळतील, त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा बैठकीत देण्यात आला. तसेच इमारत मालकांनी अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत ठेवणे, कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देणे आणि अग्निशमन विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी