कर्जत - गुंडगेतील दोन खोल्यांच्या नावाखाली चार लाखांची फसवणूक; दोघांविरुद्ध कर्जत पोलिसांत गुन्हा
रायगड, 02 जुलै (हिं.स.)। गुंडगे येथील चाळ प्रकल्पात दोन खोल्या देण्याचे आमिष दाखवून तब्बल 4 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ''पाल डे
Fraud of ₹4 lakh involving two rooms in Gundge; case registered against two individuals at Karjat Police Station.


रायगड, 02 जुलै (हिं.स.)। गुंडगे येथील चाळ प्रकल्पात दोन खोल्या देण्याचे आमिष दाखवून तब्बल 4 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी 'पाल डेव्हलपर्स' या नावाने भागीदारीत बांधकाम व्यवसाय सुरू करून मौजे गुंडगे येथे चाळीचे बांधकाम सुरू असल्याचे सांगितले होते. त्यांनी फिर्यादीला चाळीतील बी-3 आणि जीबी-4 या प्रत्येकी 230 चौरस फुटांच्या दोन खोल्या देण्याचे आश्वासन दिले.

यासाठी फिर्यादीकडून सन 2015 ते 2018 या कालावधीत रोख रक्कम व धनादेशाद्वारे एकूण 4 लाख रुपये बयाणा म्हणून स्वीकारण्यात आले. मात्र, त्यानंतर अनेक वर्षे उलटूनही चाळीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले नाही तसेच संबंधित दोन खोल्यांचा ताबाही फिर्यादीला देण्यात आला नाही.

फिर्यादीने वेळोवेळी विचारणा केल्यानंतर आरोपींनी काम सुरू आहे, परवानगी मिळाली आहे, लवकरच तुमच्या नावावर खोल्या करून देतो अशी विविध आश्वासने देत वेळकाढूपणा केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

अखेर फिर्यादीने पैसे परत मागितल्यानंतर आरोपींनी रक्कम परत देण्यास नकार देत, तुला एक रुपयाही देणार नाही, जे करायचे ते कर अशी धमकी दिली. तसेच घरी आल्यास परिणाम वाईट होतील, अशी धमकी देऊन धक्काबुक्की करत हुसकावून लावल्याचेही फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.

या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 283/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 318(4), 351(2) व 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीषा लटपटे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande