
जळगाव, 02 जुलै (हिं.स.) : जळगाव शहरात बेकायदेशीररीत्या प्रतिबंधित गुटख्याची साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंगुबाई शाळेजवळील रुबी अपार्टमेंटमधील एका घरावर छापा टाकून तब्बल ६१ हजार ६४ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अन्न सुरक्षा अधिकारी अमोल कैलास जगताप (वय ३०) यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. गंगुबाई शाळेजवळील रुबी अपार्टमेंटमध्ये काही व्यक्ती बेकायदेशीरपणे प्रतिबंधित गुटख्याचा साठा करून त्याची विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती.
या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला. झडतीदरम्यान प्रिमियम विमल पान मसाला, मिराज सेंटेड तंबाखू, व्ही-१ तंबाखू, डायरेक्ट पान मसाला आणि करमचंद पान मसाला यांसारख्या विविध प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला.
या प्रकरणी तिघांविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. हा गुटखा नेमका कुठून आणला जात होता आणि त्याचे वितरण कुठे केले जात होते, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर