
मुंबई, 02 जुलै (हिं.स.)।मुंबईत गुरुवारी सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून, वाहतुकीवर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे. अंधेरी, किंग्ज सर्कल आणि गांधी मार्केट परिसरातील रस्ते जलमय झाले असून, वाहनांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सततच्या पावसामुळे दादर रेल्वे स्थानकावरील रेल्वे रुळांवरही पाणी साचल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी ) मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. सकाळपासून पुढील तीन तासांत काही ठिकाणी मध्यम ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हवामान विभागाने नागरिकांना कमकुवत बांधकामे, सखल व पाणी साचणारे भाग टाळण्याचा, तसेच झाडे आणि वीज खांबांपासून सुरक्षित अंतर राखण्याचा आणि हवामानाच्या ताज्या माहितीकडे लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान, मुंबईतील भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, १ जुलै रोजी सकाळी ८ ते २ जुलै रोजी सकाळी ७ या २४ तासांच्या कालावधीत पूर्व उपनगरांत सर्वाधिक पावसाची नोंद झाली. मुलुंडमधील मिथागर नगरपालिकेच्या शाळेत २३०.८ मिमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर मानखुर्द अग्निशमन केंद्रात २२८.६ मिमी आणि एस वॉर्ड कार्यालयात २२७ मिमी पाऊस झाला.
मुंबई शहरात एफ साऊथ वॉर्ड कार्यालयात २२३.८ मिमी पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ जी साऊथ वॉर्ड कार्यालयात २०८.२ मिमी, तर वडाळ्यातील बी. नाडकर्णी पार्क महानगरपालिका शाळेत २०६.२ मिमी पावसाची नोंद झाली.
पश्चिम उपनगरांत सांताक्रूझ येथील एसडब्ल्यूएम कार्यशाळेत २२३.४ मिमी पाऊस झाला. त्यानंतर सांताक्रूझमधील नारळवाडी शाळेत २२२.२ मिमी, अंधेरी अग्निशमन केंद्रात २१३.२ मिमी, के-ईस्ट वॉर्ड कार्यालयात २००.८ मिमी आणि के-वेस्ट वॉर्ड कार्यालयात २००.६ मिमी पावसाची नोंद झाली.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ नरेश यादव यांनी बुधवारी सांगितले की, मान्सून लवकरच पंजाब, हरियाणा, दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश तसेच गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीच्या आणखी काही भागांमध्ये सक्रिय होण्याची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवसांत कोकण, गोवा आणि दक्षिण गुजरातमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, या भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.याशिवाय, ओडिशा आणि मध्य भारतातील अनेक भागांतही पुढील काही दिवसांत अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode