पाथरी येथे 6 जुलै रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन
परभणी, 02 जुलै (हिं.स.)। जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी, डीजेपी एज्युकेशनल कॅम्पस, पोहेटाकळी तसेच अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ
पाथरी येथे 6 जुलै रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन


परभणी, 02 जुलै (हिं.स.)।

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी, डीजेपी एज्युकेशनल कॅम्पस, पोहेटाकळी तसेच अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर (दिंडोरी प्रणित) शाखा शिवाजीनगर, पाथरी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, ६ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजता पाथरी येथील डीजेपी एज्युकेशनल कॅम्पस, पोहेटाकळी, येथे “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” आयोजित करण्यात आला आहे.महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत जिल्ह्यातील गरजू सुशिक्षित बेरोजगारांना खाजगी क्षेत्रात नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात राज्यातील विविध नामांकित उद्योजक, कंपन्या व खाजगी आस्थापनांचा सहभाग असणार आहे.जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी इत्यादी शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांची क्षेत्र अधिकारी (SFO), क्षेत्र अधिकारी (RO), ट्रेनी ऑपरेटर, विमा सल्लागार, विमा सखी, लाईफ मित्र, ऑफिस स्टाफ आदी पदांसाठी मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे. या पदांसाठी सुरुवातीचे किमान वेतन रु. १० हजार ते रु. १८ हजार इतके असून, अनुभवाच्या आधारे वेतनामध्ये वाढ होऊ शकते.रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सुशिक्षित उमेदवारांनी नाव नोंदणी महाराष्ट्र शासनाच्या (mahaswayam.gov.in) या संकेतस्थळावर करावी. नाव नोंदणीची सुविधा महारोजगार मेळाव्याच्या ठिकाणी देखील करण्यात आलेली आहे. महारोजगार मेळाव्यात प्रत्यक्ष नाव नोंदणी करण्यासाठी ६ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजता डी.जे.पी.एज्युकेशनल कॅम्पस पोहेटाकळी, ता. पाथरी येथे स्वखर्चाने सर्व उमेदवारांनी उपस्थित राहावे.जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी सहभाग नोंदवावा तसेच अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत कार्यालयाच्या दूरध्वनी क्र. 02452-220074 वर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त प्र. सो. खंदारे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande