

रायगड, 02 जुलै, (हिं.स.)। अलिबाग : भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयांतर्गत सुरू करण्यात आलेल्या 'विकसित भारत रोजगार आणि आजिविका हमी मिशन (ग्रामीण)' (VB-GRAMG) या योजनेमुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि अकुशल कामगारांच्या शाश्वत विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन रोजगार हमी योजना व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी केले.
अलिबाग येथील जिल्हा नियोजन भवनात आयोजित जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमात दूरदृश्यप्रणालीद्वारे ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पशुसंवर्धन व कृषी सभापती वैकुंठ पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र राठोड, प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री गोगावले यांनी सांगितले की, 1 जुलै 2026 पासून राज्यात ही योजना लागू करण्यात आली असून, पूर्वीच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या जागी तिची अंमलबजावणी केली जात आहे. या योजनेत ग्रामीण अकुशल कामगारांना मिळणाऱ्या रोजगाराची मर्यादा 100 मनुष्यदिवसांवरून 125 मनुष्यदिवसांपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच योजनेअंतर्गत राबविता येणाऱ्या कामांची संख्या 256 वरून 318 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
या सुधारणांमुळे ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याबरोबरच जलसंधारण, ग्रामीण पायाभूत सुविधा, उपजीविका विकास आणि हवामान बदलाशी सुसंगत विकासकामांना गती मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विविध शासकीय विभाग तसेच स्वयंसेवी संस्थांनी समन्वयाने काम करून योजनेचा लाभ तळागाळातील शेतकरी व मजुरांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले.
कोकण हा पर्यटन आणि औद्योगिकीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रदेश असून जिल्ह्यात रोजगारवाढीसाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही मंत्री गोगावले यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले की, ही योजना रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. जिल्ह्यात कृषी विभागामार्फत 700 शेततलावांची निर्मिती करण्यात आली असून, 15 ऑगस्ट 2026 रोजी या तलावांमध्ये मत्स्यबीज सोडण्यात येणार आहे. त्यामुळे शेतीबरोबरच मत्स्यव्यवसायालाही चालना मिळेल. तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी ग्रामपंचायतींनी अधिकाधिक बांबू लागवड करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात विकसित भारत रोजगार आणि आजिविका हमी मिशन (ग्रामीण) अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या नवीन कामांचे कार्यादेश लाभार्थींना मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. या कार्यक्रमास विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच महिला बचत गटांच्या सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)