एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड प्रकल्पाला वेग; राज्यभरात ६२.८६ लाख नोंदणी, ३५.५२ लाख कार्डे सक्रिय - मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई, 02 जुलै (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) प्रकल्पाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ३० जून २०२६ अखेर ६२ लाख ८६ हजार ७६५ प्रवाशांनी NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असून
MSRTC NCMC smart card project


मुंबई, 02 जुलै (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) प्रकल्पाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ३० जून २०२६ अखेर ६२ लाख ८६ हजार ७६५ प्रवाशांनी NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असून, त्यापैकी ३५ लाख ५२ हजार ३३२ कार्डे सक्रिय (ॲक्टिव्हेट) करण्यात आली आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

१ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या पात्र प्रवाशांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी उर्वरित कालावधीत अधिकृत परवानाधारक केंद्रांवर जाऊन NCMC स्मार्ट कार्डची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

NCMC प्रकल्पाच्या अंमलबजावणीत छत्रपती संभाजीनगर प्रदेशाने सर्वाधिक कामगिरी नोंदवली असून, तेथे १५ लाख ९३ हजार २५६ प्रवाशांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ८ लाख ८६ हजार ४७३ कार्डे सक्रिय करण्यात आली आहेत. त्यानंतर पुणे प्रदेश १४ लाख ७१ हजार ४३६ नोंदणींसह दुसऱ्या, तर नाशिक प्रदेश १४ लाख ३८ हजार ६९ नोंदणींसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

विभागनिहाय कामगिरीत जळगाव विभागाने ४ लाख ६३ हजार २३० नोंदणींसह आघाडी घेतली आहे. त्यानंतर अहिल्यानगर विभागाने ३ लाख ९५ हजार ५१५, सातारा विभागाने ३ लाख ४८ हजार ४१८, सोलापूर विभागाने ३ लाख ४२ हजार २४२, बुलढाणा विभागाने ३ लाख ३१ हजार ११ आणि बीड विभागाने ३ लाख २७ हजार ७०९ नोंदणी करून उल्लेखनीय प्रगती साधली आहे.

एसटी महामंडळाने विविध प्रवासी सवलती, डिजिटल तिकीट व्यवस्था आणि 'वन नेशन, वन कार्ड' ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी NCMC प्रकल्पाला प्राधान्य दिले आहे. आगामी काळात नोंदणीकृत उर्वरित प्रवाशांची कार्डे सक्रिय करण्यासाठी विशेष मोहीम अधिक गतिमान करण्यात येणार असून, राज्यातील प्रत्येक पात्र प्रवाशापर्यंत NCMC स्मार्ट कार्ड पोहोचविण्याचा महामंडळाचा निर्धार असल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande