
- महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानुसार अतिरिक्त मनपा आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत
* सात दिवसात अहवाल सादर करण्याचे समितीला निर्देश
मुंबई, 02 जुलै (हिं.स.) - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मलनिस्सारण प्रचालन खात्यामार्फत गुरुवारी (दिनांक २ जुलै २०२६) दुपारी कुर्ला साकीनाका येथील खैरानी मार्गालगत मनुष्य प्रवेशिकेवर (Manhole) ‘संरक्षक जाळी' बसविण्याची कार्यवाही सुरू असताना एका व्यक्तीचा संबंधित मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी गंभीर दखल घेत ‘एल’ विभागाचे सहायक आयुक्त श्री. धनाजी हेर्लेकर यांच्यासह सहायक/दुय्यम अभियंता (परिरक्षण, एल विभाग) श्री. दीपक चौगुले, कनिष्ठ अभियंता (परिरक्षण, एल विभाग) श्री. अभिजीत चौगुले, सहायक अभियंता (मलनिस्सारण प्रचालन) श्री. उत्तम पाटील यांना चौकशीसापेक्ष निलंबित केले आहे.
तसेच, सुरक्षेच्या नियमांबाबत कामात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत. या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी आणि महानगरपालिका क्षेत्रात अशा घटनेची पुनरावृत्ती होवू नये यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी गठीत करण्यात आली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 'एल' विभाग परिसरात कुर्ला साकीनाका येथील खैरानी मार्गालगत मलनिस्सारण प्रचालन खात्यामार्फत 'मनुष्य प्रवेशिकेवर (Manhole) संरक्षक जाळी' बसवण्याची कार्यवाही सुरू होती. ही कार्यवाही सुरू असताना कंत्राटदराने सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेतली नसल्याचे शकृत दर्शनी दिसून आले. त्यावेळी रस्त्यावरून श्री. असलम इसाक शेख (वय ५५ वर्षे) हे मोबाईलवर बोलत पायी जात होते. श्री. शेख मॅनहोलजवळ आले त्यावेळी मॅनहोलजवळ कामासाठी उभ्या असलेल्या व्यक्तींनी त्यांना आवाज देऊन थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्दैवाने श्री. शेख यांचा तोल जाऊन ते 'मॅनहोल' मध्ये पडले. बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अग्निशमन दल आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. तथापि, दुर्दैवाने त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.
या घटनेची गंभीर दखल घेत महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, एल विभागाच सहायक आयुक्त श्री. धनाजी हेर्लेकर, सहायक/दुय्यम अभियंता श्री. दीपक चौगुले, कनिष्ठ अभियंता श्री. अभिजीत चौगुले, सहायक अभियंता श्री. उत्तम पाटील यांना चौकशीसापेक्ष निलंबित करण्यात आले आहे. तसेच सुरक्षेत हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.
या दुर्दैवी घटनेतील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने १० लाख रुपयांचे अर्थयहाय्य करण्याचे माननीय महापौर श्रीमती रितू तावडे यांनी जाहीर केले आहे.
उच्चस्तरीय चौकशीची नेमणूक
सदर घटना कशामुळे घडली, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अशी घटना पुन्हा घडू यासाठी उपाययोजना सुचविण्याकरिता अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या समितीत उपआयुक्त (सामान्य प्रशासन), उपआयुक्त (परिमंडळ ७), उपआयुक्त (पायाभूत सुविधा) सदस्य आहेत. सदर चौकशी समिती सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
त्याचबरोबर भविष्यात अशी दुर्दैवी घटना घडू नये, या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मनुष्य प्रवेशिकेची कामे करताना चारही बाजूंनी सुरक्षारोधक (Barricades) लावण्याचे निर्देश पुन्हा एकदा देण्यात आले आहेत. तसेच, पुढील आठ दिवसात महानगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या सर्वे मॅनहोलची १०० टक्के पाहणी करावी. त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करावी. त्याबाबतचा अहवाल तयार करण्याचे निर्देश सर्व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, सातही परिमंडळाचे उपआयुक्त, २६ प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्त यांना देण्यात आले आहेत.
तथापि, पावसाळापूर्व तयारीचा भाग म्हणून महानगरपालिका आयुक्त, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांनी मार्च २०२६ पासून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची वेळोवेळी बैठक घेवून सर्व खात्यांना मॅनहोलला जाळी लावण्याचे आदेश दिले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी