
पुणे, 02 जुलै (हिं.स.)।
जून महिन्यात मान्सूनने अपेक्षित हजेरी न लावल्याने राज्यातील खरीप हंगामाला मोठा फटका बसला आहे. विशेषतः मूग आणि उडदाच्या पेरण्यांचा मुख्य हंगाम जवळपास संपुष्टात आल्याने उर्वरित पेरण्यांवरही अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. पुरेशा पावसाअभावी १ जुलैअखेर राज्यात खरीप पिकांच्या केवळ २० टक्के क्षेत्रावरच पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती कृषी आयुक्तालयाने दिली आहे.
राज्यात खरीप हंगामातील पिकांचे सरासरी क्षेत्र १ कोटी ४४ लाख ३६ हजार ५४ हेक्टर इतके आहे. यापैकी १ जुलैपर्यंत केवळ २८ लाख ३९ हजार ३६३ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या असून, हे सरासरी क्षेत्राच्या अवघ्या २० टक्के आहे.
याउलट, गतवर्षी याच कालावधीत ८८ लाख ८० हजार ६२८ हेक्टर क्षेत्रावर, म्हणजेच सुमारे ६२ टक्के क्षेत्रावर खरीप पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. यंदा मात्र मान्सूनच्या विलंबामुळे पेरण्यांचा वेग मोठ्या प्रमाणात मंदावला आहे.
मूग आणि उडदासारख्या कमी कालावधीत येणाऱ्या पिकांच्या पेरणीसाठी जून महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र, पुरेसा पाऊस न झाल्याने या पिकांच्या पेरणीचा हंगाम संपत आला असून, यापुढील पेरण्या यशस्वी होण्याबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, राज्यातील अनेक भागांत अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आगामी काही दिवसांत चांगला पाऊस झाल्यास उर्वरित खरीप पेरण्यांना वेग येण्याची अपेक्षा असली, तरी सध्या शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे लागून राहिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु