
मालेगाव, 02 जुलै (हिं.स.)।
: येथील संगमेश्वरातील काटे हनुमान मंदिर परिसरातील १९ एकर जमिनीवरील आरक्षण कायम ठेवावे, या मागणीसाठी सकल हिंदू समाज व संगमेश्वर कलेक्टर पट्टा वाचवा संघर्ष समितीतर्फे गुरुवारी (दि.२) महानगरपालिकेवर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनावर आंदोलकांचे समाधान न झाल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला होता.
येथील संगमेश्वर परिसरात सुमारे १९ एकर जमिनीवर महानगरपालिकेने क्रीडांगणासाठी केलेले आरक्षण संबंधितानी रद्द करुन घेतले. त्यामुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले असून हे आरक्षण महापालिकेने कायम करावे, या जागेवरील लेऑऊट रद्द करावा, तसेच संबंधित व्यक्तीच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी, आदी मागण्यासाठी हा
मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला हिंदुत्ववादी कार्यकर्त्या हर्षा ठाकूर, सिन्नरच्या किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर शुभांगी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली श्रीराम मंदिरापासून सुरुवात करण्यात आली. हा मोर्चा महापालिकेवर
जाऊन धडकला. यावेळी पोलिसांनी महापालिकेचे प्रवेशद्वार बंद करत आंदोलकांना मनपाच्या बाहेर अडवले. त्यामुळे सदर मोर्चाचे रुपांतर धरणे आंदोलनात झाले. यावेळी आंदोलकांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.
आंदोलकांनी सदर जागेवरील आरक्षण कायम करण्यासाठी मनपालिकेने ठराव करावा, तसेच संबंधितीच्या मालमत्ताच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करुन सदर मालमत्ता सरकार जमा करावी आदी मागण्या केल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV